मुंबई - विधीमंडळात सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. यावेळी नवनिर्वाचित गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील विधानभवनात येताच विरोधकांनी 'आयाराम गयाराम, जय श्रीराम' या घोषणा दिल्या.
या अधिवेशनाच्या आधी जेव्हा विधीमंडळात जेव्हा मंत्री यायला सुरूवात झाली तेव्हा विरोधकांनी घोषणाबाजी केली. अधिवेशनासाठी जेव्हा राधाकृष्ण विखे-पाटील आले तेव्हा 'आयाराम गयाराम जय श्रीराम' अशा घोषणा देण्यात आल्या. विकासाची सगळी स्वप्ने भंग, मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तारात दंग अशाही घोषणा देण्यात आल्या.
तर, मुख्यमंत्री विधानभवनात येताच 'आले रे आले, चोरटे आले' असे म्हणत विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आणि मुख्यमंत्री आमने-सामने पाहायला मिळाले. गेली साडेचार वर्षे जे राधाकृष्ण विखे-पाटील विरोधी बाकांवर बसले होते ते आता भाजप सरकारचे मंत्री म्हणून समोर आले.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेच त्यांना मंत्रिपद कसे काय दिले जाऊ शकते? असा सवाल अजित पवारांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, पात्र व्यक्तीला मंत्री करता येते. पक्षाचा राजीनामा देऊन मंत्री झाल्याने कायद्याचा कोणताही भंग होत नाही.