मुंबई - राज्यात येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होणार याबाबतच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र सध्या मनसेसोबत युती करण्यासंदर्भात तुर्तास कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमचा शत्रू पक्ष नाही. या पक्षाने हिंदी भाषेसंदर्भातली आपली असलेली विचारधारा बदलेल, तर युती होऊ शकते, असे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासकरून मुंबई आणि नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी मनसे आणि भारतीय जनता पक्षाची युती होईल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नाशिक दौऱ्यावर होते. या दौर्या दरम्यानच या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पंधरा ते वीस मिनिटे चर्चा झाली होती. या चर्चेनंतरच मनसे आणि भारतीय जनता पक्ष यांची युती होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र आज युती संदर्भात कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. याआधीही चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर युती संदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले होते. केवळ या भेटीमध्ये औपचारिक चर्चा झाल्या असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. मात्र येणाऱ्या काळात राज ठाकरे यांनी हिंदी भाषिकांबद्दल आपली विचारधारा बदलली तर युती संदर्भात विचार केला जाऊ शकतो, असे संकेतही दिले होते.
राज ठाकरेंच्या भाषणांच्या क्लिप तपासल्या जाणार
मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा जन्म झाला. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील हिंदी भाषिका विरोधात रान उठवलं होतं. मात्र त्यांची ही भूमिका आज युतीच्या आड येत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांतील राज ठाकरे यांनी कार्यक्रमांमध्ये स्पष्ट केलेली आपली भूमिका किंवा त्या संदर्भातले भाषण हे भारतीय जनता पक्षाकडून तपासले जात आहेत. या कार्यक्रमांची किंवा भाषणाची क्लिप मनसेकडून भारतीय जनता पक्षाकडे पाठवल्या गेले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचीही भाषणे जर थेट हिंदी भाषेविरोधी नसतील तर, येणाऱ्या काळात मनसे आणि भाजपची युती होण्याची पूर्ण शक्यता आहे.