मुंबई - देशाच्या आर्थिक राजधानीत जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या प्रवासासाठी महत्त्वाचे बदल झाले आहेत. गेल्यावर्षी प्रमाणे सर्वसामान्यांसाठी लोकलची दारे पुढील पंधरा दिवस बंद राहणार आहेत. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी लोकलमधून प्रवास करू शकतात. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवसांसाठी संचारबंदीची मोठी घोषणा केली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा ही केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असणार आहे.
हेही वाचा-'नालासोपारा येथील कोरोनाग्रस्तांचा मृत्यू नसून त्यांची हत्या, राजेश टोपेंनी राजीनामा द्यावा'
लोकल बंद करण्याचे दिले होते राज्य सरकारने संकेत
कोरोनाचे रुग्ण संख्या आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी ठराविक वेळेसाठी लोकल प्रवास सुरू केला होता. मात्र, कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली. दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढू लागले. त्यामुळे लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले होते.
संबंधित बातमी वाचा-राज्यात बुधवारी रात्री ८ पासून लॉकडाऊन, अनावश्यक प्रवास टाळा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
रेल्वे स्थानकांवरील प्रवेश द्वार बंद -
राज्य सरकारकडून दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यात येईल. राज्य सरकारच्या सुचनेप्रमाणे, सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास करण्यासाठी मनाई असणार आहे. बहुतांश स्थानकातील प्रवेशद्वार, लिफ्ट, सरकते जिने व जिने बंद करण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.