मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना जयंतीनिमित्त आदरांजली वाहतानाच शिवसेनेला युतीधर्माची आठवण करून दिली आहे. बाळासाहेबांना आदरांजली वाहणारा एक व्हिडिओ फडणवीसांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओत बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांच्या काही क्लिप वापरण्यात आल्यात. यामध्ये बाळासाहेब ठाकरे हे सत्तेसाठी लाचारी न पत्करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. त्यामुळे फडणवीसांनी एकीकडे आदरांजली वाहताना दुसरीकडे शिवसेनेला फटकारे लगावण्याची संधी सोडलेली नाही.
खुर्चीसाठी लाचारी का?
'अलिकडच्या राजकारणामध्ये नेत्यांची मने छोटी होताना आपण बघतो, ते स्वतःपलिकडे बघू शकत नाही, मात्र बाळासाहेबांचे मन राजासारखे होते' या फडणवीसांच्या उद्गारांनी या व्हिडिओची सुरूवात होते. त्यानंतर बाळासाहेबांच्या भाषणांच्या क्लिप या व्हिडिओत दिसतात. "त्यांनी गद्दारी केली असा शाप महाराज आपल्याला देतील. मी फालतू लोकशाही मानत नाही, जनतेने विश्वासाने निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता? पैशाकरता? भांडण काय तुमचे? खुर्चीसाठी?... खुर्चीसाठी भांडायचे नाही. पैशांचे लाचार व्हाल, तर शिवरायांचे नाव घेऊ नका. हा भगवा झेंडा हातात घेऊ नका." असे बाळासाहेब ठाकरे बोलताना या व्हिडिओत दिसतात.
व्हिडिओतून करून दिली युतीधर्माची आठवण!
बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्ताने फडणवीसांनी शिवसेनेला युतीधर्माची आठवण या व्हिडिओतून करून दिल्याचे आता बोलले जात आहे. बाळासाहेबांनी दिलेली शिकवण शिवसेना विसरल्याचे आरोप भाजपचे अनेक नेते सातत्याने करीत आहेत. ही बाळासाहेबांची शिवसेना नसल्याचेही आरोप अनेक नेते करताना दिसत आहेत. फडणवीसांनी शेअर केलेला हा व्हिडिओ याचाच एक भाग असल्याचेही बोलले जात आहे.
हेही वाचा - बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळा अनावरणाला दिग्गजांची हजेरी; ठाकरे बंधू एकत्र येणार