मुंबई : मुंबईत अनेक वस्त्यांमध्ये लोक दाटीवाटीने राहतात. ६० टक्के मुंबईकर झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. अशा ठिकाणी आगी लागल्यास त्या ठिकाणी आग विझविणारी अग्निशमन दलाची वाहने त्वरित पोहचत नाहीत. त्यासाठी गल्लीबोळात पोहोचून आग विझविण्यासाठी प्रत्येक अग्निशमन केंद्रामध्ये एक फायर मोटारसायकल(अग्निशमन यंत्रणा असलेली बाईक) ठेवली जाणार आहे. या एका मोटारसायकलसाठी १३ लाख रुपये इतका खर्च केला जाणार असल्याची माहिती अग्निशमन दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
एका बाईकसाठी १३ लाखांचा खर्च -
मुंबईमध्ये अनेक ठिकाणी चिंचोळ्या गल्ल्या आणि रस्ते आहेत. अशा चिंचोळ्या गल्ल्या आणि रस्त्यांमुळे अग्निशमन दलाच्या गाड्या आग लागलेल्या ठिकाणी पोहोचण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आग पसरून जीवित आणि मालमत्तेची हानी होण्याची शक्यता जास्त आहेत. या पार्श्वभूमीवर गल्लीबोळातील आग वेगाने विझविण्यासाठी अग्निशमन दलात हायटेक फायर बाइक आणण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यामुळे वर्दी मिळाल्यानंतरचा रिस्पॉन्स टाइम कमी होणार आहे. परिणामी दुर्घटनेच्या तीव्रतेनुसार आवश्यक यंत्रणा वेगाने उपलब्ध करणे शक्य होणार आहे. गाडीवरच दोन पाण्याच्या टाक्या असल्याने पाठीवरून टाकीतून पाणी नेण्याची गरज राहणार नाही. पालिका एका बाइकसाठी सुमारे १३ लाख रुपये खर्च करणार आहे.
फायर बाईकचा असा होणार फायदा -
आगीची माहिती मिळताच तत्काळ ही फायर बाइक घटनास्थळी पोहोचेल. बाइकवर अग्निशमन यंत्रणा असेल. ४० लिटर पाणी, पोर्टेबल फायर सिस्टीम, कम्युनिकेशन सिस्टीम, ३० मीटर होजरील पाइप, फायर पंप, फायर एक्सटिंग्युशर अशी यंत्रणा असणार आहे. आगीचा भडका उडालेल्या ठिकाणीच छोट्या प्रमाणात आग असताना विझवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच मोठ्या बंबांच्या गाड्यांपेक्षा आगीच्या ठिकाणी लवकर पोहोचल्याने संभाव्य दुर्घटनेची तीव्रताही समजणे शक्य होणार आहे अशी माहिती अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिली.