मुंबई - चीनमधील वुहानच्या धर्तीवर वांद्रे कुर्ला संकुलात (बीकेसी) राज्यातले सर्वात मोठे ट्रान्झिट्स रुग्णालय उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये आतापर्यंत एकही रुग्ण दगावला नसल्याचा दावा, या कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी केला आहे. हे कोविड सेंटर कशाप्रकारे चालते याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी..
देशात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामध्ये राज्यातील बाधितांची संख्या जास्त असून मुंबई हे आघाडीचे शहर बनले आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी देशातील इतर कोणत्याही शहराच्या तुलनेत सर्वाधिक आहे, दिवसागणिक कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आणि मृतांची संख्या ही मुंबई शहरातच जास्त आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ रुग्णांच्या उपचारांसाठी चीन मधील वुहानच्या धर्तीवर बीकेसीमध्ये अत्याधुनिक अशा सुविधा देणारे ट्रान्झिट्स रुग्णालय उभे केले. अल्पावधित उभारण्यात आलेल्या या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचारही सुरू झाले. आता या रुग्णालयामध्ये आता पर्यंत एकही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नसल्याची दिलासादायक माहिती समोर येत आहे.
असे चालते काम-
रुग्ण रुग्णवाहिकेने दाखल झाल्यावर या सेंटरमध्ये सुरुवातीला त्याची नोंदणी होते. त्यानंतर त्या रुग्णाला सुरुवातीच्या विभागात नेऊन तेथील डॉक्टर व परिचारिका त्या रुग्णाचे ऑक्सी मीटर व तापमान तपासून त्या रुग्णाची तब्येतीची तपासणी करून आजाराच्या तीव्रतेनुसार त्या रुग्णाला संबंधित वार्डमध्ये दाखल करून घेतले जाते. त्यानंतर त्या रुग्णाला ऑक्सिजन बेड विभाग आणि अतिदक्षता विभाग यामध्ये रुग्णाला दाखल करण्यात येते. त्या वार्डात डॉक्टर्स परिचारिका ठरल्यानुसार उपचार रुग्णाला देत असतात, तीन वेळेचे जेवण आणि सर्व औषध उपचार रुग्णाला या सेंटरमध्ये देण्यात येत असल्याची माहिती सेंटर मध्ये गेल्या तीन महिन्यापासून काम करणाऱ्या डॉ. शुभम मोहोळकर यांनी दिली.
3 जूनला कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या वादळाचा या कोविड सेंटरला फटका बसला असल्याचे वृत्त प्रसिद्धी माध्यमात प्रकाशित झाले होते. मात्र याचे खंडनही कोविड सेंटरच्या प्रशासनाने केले आहे. गेले साडे तीन महिने या केंद्रात केंद्र सरकारच्या निर्देशानुसारच उपचार सुरू असून यात कोणताही खंड पडलेला नाही, असे स्पष्टीकरण बीकेसी येथील कोविड रुग्णालय प्रशासनाने दिला आहे.
सध्या मुंबईतील कोरोना बाधितांची एकूण संख्या १ लाख ३ हजार २६२ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत ५ हजार ८१४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्य स्थितीत २३ हजार ८९३ जणांवर उपचार सुरू आहेत.