मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी आज एनआयएच्या विशेष न्यायालयाने दलित अधिकार कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांना जामीन देण्यास नकार दिला. 2018 मध्ये झालेल्या या हिंसाचार प्रकरणी आनंद यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते ठाण्यातील तळोजा तुरुंगात आहेत.
एनआयएने ज्या आरोपांखाली आपल्यावर गुन्हा दाखल केला आहे, ते आरोप सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पुरावे नाहीत; असं आनंद यांचं म्हणणं होतं. याच आधारावर त्यांनी जामीन याचिका दाखल केली होती. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात आपलं नाव गुंतवणं हा दलितांचा अपमान करण्यासाठी केलेला प्रयत्न होता असंही आनंद म्हणाले.
विशेष सरकारी वकील प्रकाश शेट्टी यांनी न्यायालयात एनआयएची बाजू मांडली. ते म्हणाले की आनंद तेलतुंबडे हे एका प्रतिबंधित संघटनेचे सक्रिय सदस्य होते. कोरेगाव भीमामध्ये झालेल्या हिंसाचारासाठी भाकपा (माओवादी) आणि तेलतुंबडे हे जबाबदार होते. घटनेच्या दिवशी ते शनिवार वाड्याच्या आसपासच होते, असं त्यांच्या मोबाईलच्या जीपीएस लोकेशननुसार समोर आलं आहे. याठिकाणीच हा कार्यक्रम आणि हिंसाचार झाला होता; असंही शेट्टींनी सांगितलं.
आनंद यांच्याविरोधात दाखल असलेल्या तक्रारीत म्हटलं आहे, की या कार्यक्रमावेळी त्यांच्या हालचाली आणि वक्तव्ये ही प्रक्षोभक होती. यामधूनच हिंसाचाराला वाव मिळाला.