मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया इमारतीच्या काही अंतरावर स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या जिलेटीन स्फोटकांच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास केला जात आहे. तपासादरम्यान टप्प्याटप्प्याने एकेक प्रकरणाचा खुलासा केला जात आहे. आतापर्यंत 10 जणांना याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. मुंबई पोलीस खात्यात एकेकाळी एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि तेवढेच विवादात राहिलेल्या माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह 10 आरोपींना या स्फोटक प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. अँटिलिया इमारतीच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या स्फोटकांच्या संदर्भातील तपासाचा आढावा घेणारा ईटीव्ही भारतचा हा विशेष वृत्तांत...
सचिन वाझे 17 वर्ष निलंबित राहून पुन्हा पोलीस सेवेत
2002 घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्या ख्वाजा युनूस याच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी एन्काऊंटर फेम सचिन वाझे यास 17 वर्ष पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले होते. 17 वर्षानंतर तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीने सचिन वाझे यास पुन्हा पोलीस सेवेत सामावून घेतले होते. यानंतर सचिन वाझे याच्याकडे क्राइम ब्रांचच्या सी आययुची जबाबदारी देण्यात आली होती.
अँटिलिया स्फोटक घटनाक्रम-
25 फेब्रुवारी रोजी देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरातील कारमायकल रोडवर एक स्कॉर्पिओ गाडी रस्त्यावर पार्क करून ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर या गाडीची तपासणी करण्यात आली असता, त्यावेळी या गाडीमध्ये 20 जिलेटिनच्या कांड्या, 8 बनावट नंबर प्लेट , याच्यासह मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांना धमकी देणारे पत्र आढळून आले होते. यानंतर या प्रकरणाचा तपास सीआययुकडून केला जात असताना सचिन वाझेच या प्रकरणांमध्ये तपास करत होता. मात्र एटीएसकडून या प्रकरणाचा दुसऱ्या बाजूने तपास केला जात होता. यात महत्त्वाचे धागेदोरे एटीएसच्या हाती लागल्यानंतर संशयाची सुई ही सचिन वाझे याच्यावर बळावली होती.अँटिलिया इमारतीच्या बाहेर जी गाडी सापडली होती ती गाडी 17 फेब्रुवारी रोजी ठाण्यातील व्यवसायिक मनसुख हिरेन याच्या मालकीची असल्याचे समोर आले. त्यानंतर या संदर्भात मनसुख हिरेन यास एटीएसकडून ताब्यात घेण्यात आले होते. मात्र सदरची स्कॉर्पिओ गाडी ही 17 फेब्रुवारी रोजी चोरीस गेल्याची तक्रार विक्रोळी पोसील ठाण्यात मनसुखने केली होती. पुढे एटीएसच्या तपासात हे स्पष्ट झाले की, मनसुखनेच ही गाडी विक्रोळी हायवेवर रस्त्याच्या कडेला पार्क केली होती आणि तिथून तो टॅक्सीने दक्षिण मुंबईकडे निघून गेल्या होता.
एटीएसकडून तपास एनआयएकडे
एटीएस या संदर्भात तपास करत असताना मुलुंड टोल नाक्यावर 25 फेब्रुवारी रोजी रात्री 1 वाजता एक ईनोव्हा गाडी मुंबईच्या दिशेने जाताना आढळून आली होती. ही तीच ईनोव्हा कार होती जी स्कॉर्पिओ गाडीच्या पाठीमागे उभी करण्यात आलेली होती. ज्यामध्ये स्वतः सचिन वाझे हा बसलेला होता. आशियातील सर्वात श्रीमंत असलेल्या व्यक्तीच्या घराच्या काही अंतरावर स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिनच्या कांड्या सापडल्यानंतर याचा तपास केंद्रातील राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरू करण्यात आला. सचिन वाझे यास सर्वप्रथम अटक करण्यात आली होती, त्यानंतर एकामागून एक काही गाड्या या राष्ट्रीय तपास यंत्रणेने जप्त केल्या होत्या. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ 16 मार्च रोजी काळ्या रंगाची मर्सिडीज गाडी जप्त करण्यात आली होती. ज्यामध्ये 5 लाख रुपये रोख व नोटा मोजण्याच्या मशीनसह 2 बनावट नंबर प्लेट , काही कपडे व कागदपत्रे राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळून आले. या सर्व गोष्टी सचिन वाझे याच्याच असल्याचं तपासात समोर आले होते.
असा आहे घटनाक्रम-
1) फेब्रुवारी 17 रोजी मनसुख हिरेन याची गाडी चोरीला गेल्याची तक्रार मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आली. 2) मात्र हीच गाडी सचिन वाझे यांच्या ठाण्यातील साकेत सोसायटीमध्ये पार्क करण्यात आल्याचेही तपासात समोर आले. काही दिवस साकेत सोसायटीत सदरची स्कॉर्पिओ गाडी पार्क करण्यात आल्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी अँटिलिया या इमारतीच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली ही गाडी पार्क करण्यात आली होती. 3) 26 फेब्रुवारी रोजी या गाडीचा ताबा असलेल्या मनसुख हिरेन यास एटीएसकडून तपासासाठी ताब्यात घेण्यात आले होते. 27 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून मनसुख यास चौकशीसाठी एनआयएच्या पथकासमोर हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते.4) 27 फेब्रुवारी रोजी सचिन वाझे याचा सहकारी पोलीस उपनिरीक्षक रियाज काजी हा सचिन वाझे याच्या ठाण्यातील साकेत सोसायटी गेल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून आले होते. या ठिकाणी त्याने सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज हे तपासासाठी हवी असल्याचा अर्ज सोसायटीच्या कमिटीला दिला होता. 17 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी पर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज घेऊन गेला होता.5) 2 मार्च रोजी या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या मनसुख याने पोलिसांकडे तक्रार करत म्हटले होते की, काही पोलीस अधिकारी व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी त्यास विनाकारण त्रास देत आहेत. मात्र अचानक दोन दिवसानंतर म्हणजेच 4 मार्च रोजी मनसुख हा बेपत्ता झाला होता. 6) यादरम्यान राज्याचे अधिवेशन सुरू असताना 5 मार्च रोजी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी अधिवेशन काळामध्ये सचिन वाझे या अधिकाऱ्यांचा या प्रकरणी सहभाग असल्याचा आरोप केला. तसेच सचिन वाझे हा मनसुख हिरेन याच्या चांगला ओळखीचा असल्याचाही दावा त्यांनी सभागृहात केला होता.6) 5 मार्च रोजी ठाण्यातील खाडीजवळ मनसुख हिरेन याचा मृतदेह आढळून आला. यानंतर इमारतीच्या बाहेर मिळालेली स्कॉर्पिओ गाडी, मनसुख हिरेन याचा मृत्यू संदर्भात व स्कॉर्पिओ गाडी चोरी होण्याच्या संदर्भातील तपास महाराष्ट्र एटीएस कडून राष्ट्रीय तपास यंत्रणेने वर्ग करून घेतला होता. 13 मार्च रोजी सचिन वाझे यास राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्याठिकाणी 12 तास त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्यास अटक करण्यात आली होती .
10 जणांना अटक असा आहे प्रत्येकाचा सहभाग विनायक शिंदे अँटिलिया स्फोटक प्रकरणातील आरोपी जस जसा राष्ट्रीय तपास यंत्रणेनेचा तपासा पुढे जात होता त्यानुसार एक-एक करून यातले मोहरे राष्ट्रीय तपास यंत्रणा टीपत होती. सर्वात आधी सचिन वाझे यांची अटक झाल्यानंतर गुजरातमधील बनावट सीम कार्ड बाळगणाऱ्या लखनभैया एन्काऊंटर प्रकरणातील आरोपी विनायक शिंदे यास अटक करण्यात आली होती.
नरेश गोर अँटिलिया स्फोटक प्रकरणातील आरोपी विनायक शिंदे यास बनावट सीम कार्ड देणाऱ्या नरेश गोर या आरोपीस अटक करण्यात आली.
सुनील माने अँटिलिया स्फोटक प्रकरणातील आरोपी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट 12 चा अधिकारी सुनील माने यांचे नाव सुरुवातीपासूनच या प्रकरणांमध्ये येत होते. सुरुवातीला राष्ट्रीय तपास यंत्रणेने 2 ते 3 वेळा सुनील माने याची कसून चौकशी केली होती. त्यानंतर मनसुख हिरेन यास ठाण्यातील कळवा या ठिकाणी नेले जात असताना ज्या गाडीमध्ये मनसुख यास बसवण्यात आले होते, त्या गाडीला एस्कॉर्ट करण्याची जबाबदारी सुनील माने याने पार पडली असल्याचे समोर होते. त्यानंतर त्यास अटक करण्यात आली आहे.
रियाज काझी-अँटिलिया स्फोटक प्रकरणातील आरोपी रियाज काजी हा सचिन वाझे याचा जवळचा सहकारी मानला जात होता. सचिन वाझे याच्या सांगण्यावरूनच त्याने ठाण्यातील साकेत सोसायटी जाऊन सोसायटीच्या कमिटीकडे सीसीटीव्ही फुटेज व डीव्हीआर हा पोलीस तपासासाठी हवा असल्याचा अर्ज दिला होता. त्यानंतर सदरचे डीव्हीआर व सीसीटीवी फुटेज घेऊन पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला होता.
संतोष शेलार व आनंद जाधवअँटिलिया स्फोटक प्रकरणातील आरोपी काही दिवसापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबईतील गोरेगाव परिसरातून एक टवेरा गाडी जप्त केलेली आहे. ही तीच टवेरा गाडी आहे, ज्यामध्ये हिरेन मनसुख यास बसवून ठाणे परिसरामध्ये नेण्यात आले होते. याच गाडीत त्याचा खून करण्यात आला होता. सदरची गाडी आनंद जाधव या व्यक्तीच्या नावावर असून संतोष शेलार हा या गाडीच्या संपर्कात असल्याचे समोर आलो होते. त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली होती.
प्रदीप शर्मा-अँटिलिया स्फोटक प्रकरणातील आरोपी मुंबई पोलीस खात्यात 117 हून अधिक एन्काऊंटर करणाऱ्या माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माची राष्ट्रीय तपास यंत्रणेने या अगोदर तब्बल 7 तास चौकशी केली होती. संतोष शेलार या व्यक्तीची राष्ट्रीय तपास यंत्रणेने चौकशी केल्यानंतर प्रदीप शर्माचा या प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होत. प्रदीप शर्मा यांच्या घरातून राष्ट्रीय तपास यंत्रणेला परवाना संपलेले पिस्तूल व काही जिवंत काडतुसे आढळून आलेली आहेत. मनसुख याची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यामध्ये प्रदीप शर्मा याचा सर्वात मोठा सहभाग असल्याचा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला आहे. सचिन वाझे व प्रदीप शर्मा या दोघांनी आनंद जाधव, संतोष शेलार यांच्यासह बऱ्याच वेळा मिटींग केल्याचाही राष्ट्रीय तपास यंत्रणेचे म्हणण आहे.
सतीश तिरुपती मोतकुरी व मनिष वसंत सोनी-अँटिलिया स्फोटक प्रकरणातील आरोपी अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा याच्या खास मर्जीतील व्यक्ती असून मनसुख यांची हत्या करण्याच्या वेळेस हे दोघेही घटनास्थळी हजर असल्याचा आरोप राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून करण्यात आलेला आहे.