मुंबई - कोरोनाच्या लसीकरणाचा टप्पा सुरू होण्यापूर्वी आदल्यादिवशी (शुक्रवारी) मुंबईत कोरोनाचे नवे 574 रुग्ण आढळले आहेत. तर 8 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
मुंबईमधील कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 1 हजार 652 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 11 हजार 227 वर पोहचला आहे. मुंबईमधून 793 रुग्ण शुक्रवारी बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 82 हजार 432 वर गेला आहे. सध्या मुंबईत कोरोनाचे 7 हजार 104 सक्रिय रुग्ण आहेत. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे आजवर मुंबईमध्ये आढळले आहेत.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 382 दिवसांवर -
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 382 दिवस तर सरासरी दर 0.21 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 130 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 2 हजार 274 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 25 लाख 65 हजार 443 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
रुग्णसंख्यांची नोंद
- 7 नोव्हेंबर 576 रुग्ण
- 2 नोव्हेंबर 706 रुग्ण
- 3 नोव्हेंबर 746 रुग्ण
- 6 नोव्हेंबर 792 रुग्ण
- 9 नोव्हेंबर 599 रुग्ण
- 10 नोव्हेंबर 535 रुग्ण
- 14 नोव्हेंबर 574 रुग्ण
- 16 नोव्हेंबर 409 रुग्ण
मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. तर 16 नोव्हेंबरला रुग्ण संख्या 409 पर्यंत खाली आली होती.
दरम्यान, 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोहीम मुंबईसह देशभरात सुरू होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण आणखी कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.