मुंबई - भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर बेछूट आरोप केले जात आहेत. हे आरोप करण्याआधी काही आयपीएस आणि आयएएस अधिकारी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात. त्यानंतर मंत्र्यांवर आरोप केले जातात आणि कारवाई देखील सुरू होते असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
'महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपचे कटकारस्थान'
भारतीय जनता पक्षाकडून केंद्रातील सत्तेचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप मलिक यांनी केला. नवाब मलिक म्हणाले, 'काही आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांना हाताशी धरून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात कट कारस्थान करून आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज (मंगळवार) मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नवाब मलिक यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे.
केवळ महाराष्ट्रातच नाही तर, देशामध्ये ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार नाही. अशा राज्यांमध्ये केंद्र सरकार अशा प्रकारचे षडयंत्र करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आला. आघाडी सरकार मधील नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार संजय राऊत, खासदार भावना गवळी या सर्व नेत्यांना राजकीय हेतूने अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
हेही वाचा - नवीनच गोष्ट...माझ्याही ज्ञानात भर पडली, शरद पवारांचा मोहन भागवत यांना खोचक टोला