मुंबई - पुण्यामध्ये व वक्फ बोर्डच्या कार्यालय मध्ये ईडी ( सक्तवसुली संचालनालय) कडून धाडी टाकल्या असल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र, अशा कोणत्याच धाडी पडल्या नाहीत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या अफवा पसरवू नयेत. यापेक्षा ईडी कार्यालयाने केलेल्या कारवाईबाबत पत्रकार परिषद घेऊन प्रसार माध्यमांना योग्य माहिती द्यावी. असा सल्ला राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयाला दिला आहे. आपल्या मालकांना खुश करण्यासाठी काही अधिकारी अशा प्रकारच्या बातम्या पेरत आहेत.
आघाडी सरकारने वक्फ बोर्डात सफाईचे काम केले
पुण्यातील वक्फ बोर्डाची जमीन एमआयडीसीने संपादित केली होती. ती जमीन काही लोकांनी खोटी कागदपत्र दाखवून सरकारी कार्यालयातून पैसे उकळले. याबाबत माहिती मिळताच बोर्डाने पोलिसात तक्रार केली असून याबाबत पाच लोकांना ताब्यात घेण्यात आलं. हे सर्व पाहिल्यानंतर आघाडी सरकारने वक्फ बोर्डात सफाईचे काम( क्लीन अप अभियान) सुरू केले असल्याचा इशारा नवाब मलिक यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिला आहे.
मालिकांचा भाजपला इशारा
वक्फ बोर्डमधील नवाब मलिक यांचा घोटाळा बाहेर काढू अशी वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांकडून केली जात आहे. मात्र, राज्य सरकारने वक्फ बोर्डात 'क्लिनप अभियान' सुरू केला आहे. केवळ वक्फ बोर्डच नाही तर राज्यभरात मंदिर, मज्जितला देण्यात आलेल्या जमिनी मध्ये कोणी घोटाळा केला? हे सर्व बाहेर येईल असा इशारा नवाब मलिक यांनी भाजपच्या नेत्यांना दिला आहे. तसेच, मंदिराच्या नावाखाली भाजपच्या एका नेत्यांनी शेकडो एकर जमीन लाटली आहे. हे प्रकरणी आम्ही लवकरच बाहेर काढू असेही नवाब मलिक यावेळी म्हणाले आहेत.
पद्मश्रीही मागे घ्यावा
यावेळी मलिक यांनी कंगनावर जोरदार टीका केली आहे. महात्मा गांधी यांच्यापासून सर्वच स्वातंत्र सैनिकांचा कंगनाने आपमान केला आहे. याची दखल घेत केंद्र सरकारने याची दखल घेत कंगनावर गुन्हा दाखल करण्याची सुचना करावी अशी मागणी मलिक यांनी केली आहे. तसेच, कंगनाला दिलेला पद्मश्रीही मागे घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
तीच्यावर कठोर कारवाई करावी
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या लोकांचा हा मोठा अपमान आहे. अशा व्यक्तिंना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. याचा केंद्र सरकारने एकदा विचार करावा, आणि कंगणाचा हा पद्मश्री पुरस्कार मागे घ्वावा. तसेच, तीच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
हेही वाचा - अनिल देशमुख मेडिकल चेकअपसाठी रुग्णालयात, ईडी कोठडी संपली; पुढे काय?