मुंबई/अमरावती - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा शुक्रवारी रात्री आठ वाजता बडनेरा इथून विदर्भ एक्सप्रेसने मुंबईला रवाना होणार होते. याबाबत त्यांनी दोन दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. राणा दाम्पत्य शुक्रवारी मुंबईला जाणार असल्याची माहिती असल्याने पोलीस यंत्रणा शुक्रवारी सकाळपासूनच अलर्ट असताना पोलिसांना गाफील ठेवून राणा दाम्पत्य शुक्रवारी रात्रीच अमरावतीतून मुंबईकडे रवाना झाले होते. ते सकाळी मुंबईत पोहोचल्याची माहिती आहे.
मातोश्रीबाहेरील सुरक्षेत वाढ - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांचे खाजगी निवासस्थान असलेले 'मातोश्री' बंगल्याबाहेर हनुमान चालीसा वाचन करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यांच्या इशाऱ्यानंतर मुंबई पोलिसांनी मातोश्री निवासस्थानाबाहेरची सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवली आहे. हनुमान जयंती पासूनच राणा दाम्पत्याने हनुमान चालीसाचे पठण करावे अशी विनंती केली होती. जर मुख्यमंत्री हनुमान चालीसाचे पठण करणार नसतील तर आम्ही मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसाचे पठण करू असा इशारा राणा दामप्त्याने दिला होता. त्यानुसार शनिवारी 23 एप्रिल रोजी आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याचं राणा दाम्पत्याने सांगितले. तसेच आपल्याला यासाठी पोलिसांनी किंवा शिवसैनिकांनी अडवू नये असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे. मात्र त्यांच्या इशाऱ्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
हेही वाचा - Today Weather In Maharashtra : उन्हाळा पोळतोय! वाचा आजचे राज्यातील तापमान
राणांचा चकवा - अमरावतीतून आज रात्री राणा दाम्पत्य मुंबईच्या दिशेने निघतील अशी माहिती आहे. राणा दाम्पत्यांना अमरावतीतच अडवण्याचा निर्धार अमरावतीतील शिवसैनिकांनी केला आहे. तसेच राणा दाम्पत्यांना अमरावतीच्या बाहेरच पडू देणार नाही असा इशारा अमरावतीच्या शिवसैनिकांकडून देण्यात आला आहे. राणा दाम्पत्यांच्या वक्तव्याची दखल घेण्याची गरज नाही असा टोलाही राज्याचे नगर विकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी लगावला होता. मात्र आता राणा दाम्पत्य मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा चे वाचन करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर सुरक्षाव्यवस्था चौकस करण्यात आली आहे.
शिवसैनिकांनाही पत्ता नाही - खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांना बडनेरा रेल्वे स्थानकावरच अडविण्यासाठी सायंकाळी पाच वाजल्यापासून बडनेरा रेल्वे स्थानकावर सर्व शिवसैनिकांनी एकत्रित यावे असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते. बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहोचण्यासाठी जिल्हाभरातील शिवसैनिक अमरावतीत शुक्रवारी सकाळी पोहोचणार असतानाच राणा दाम्पत्य रात्रीचा अमरावती वरून नागपूरला रवाना झाले आणि तेथून आज पहाटे साडेतीन वाजता मुंबईला गेल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शिवसैनिकही हादरून गेले आहेत.