मुंबई - १४ एप्रिल १९४४ रोजी फोर्ट स्टिकिन ही मालवाहू बोट ९ एप्रिलला कराची बंदरातून मुंबईकडे येण्यास निघाली होती. या बोटीत काही स्फोटक पदार्थ असल्यामुळे बोटीला मोठी भीषण आग लागली. ही आग विझवताना अग्निशमन दलाचे ६६ अग्निशमन जवान आणि अधिकाऱयांचा मृत्यू झाला होता. या जवानांच्या स्मरणार्थ १४ एप्रिल हा दिवस सरकारने पुढे 'अग्निशमन दिवस' म्हणून जाहीर केला. या वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना याचनिमिताने मुंबईत अग्निशमन मुख्यालय येथे आज आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मुंबई पालिका आयुक्त अजोय मेहता व अग्निशमन सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
ही घटना घडली तेव्हा जहाजात कापसाच्या गासडय़ा, तेलाची पिंपे, भंगार सामान, तांदूळ, लाकूड इत्यादी सामान होते. या मालवाहू बोटीत ७ हजार टन माल ५ फाळक्यांत भरण्यात आला होता. १ हजार टन स्फोटके, दारुगोळा, सिग्नल रॉकेटस् व टॉर्पेडोज भरण्यात आले होते. १ कोटी किमतीचे सोने लाकडी पेटय़ांमध्ये ठेवण्यात आले होते. ते ही या आगीत जाळून खाक झाले.
फोर्ट स्टिकिन हे मालवाहू जहाज मुंबई बंदरातील व्हिक्टोरिया डॉक नं. २ येथील धक्क्याला लागले होते. स्फोटके उतरविण्यासाठी लागणारे साहित्य नसल्यामुळे १३ एप्रिल रोजी दुपारनंतर या कामाला सुरुवात झाली. परंतु कामाला खरा वेग १४ एप्रिलच्या सकाळपासून आला. दुपारच्या सुमारास २ नंबरच्या फाळक्यातून धूर येताना दिसला. लगेच अग्नी संबंधित जहाजाने भोंगा वाजवून इशारा दिला. तेव्हा तत्काळ मांडवी अग्निशमन केंद्राचे बंब घटनास्थळी रवाना झाले. त्यांना ताबडतोब मोठय़ा आगीची २ नं. वर्दी देण्यात आली. थोडय़ाच वेळात आणखी अग्निशमन दलाच्या बंबगाडय़ा घटनास्थळी आल्या. पाण्याच्या फायर फायटिंगसाठी होजच्या ३२ लाइन्स चालू करण्यात आल्या.
...तो आदेश जवानांच्या कानांपर्यंत पोहोचलाच नाही
दुपारी ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत ९०० टन पाणी २ नं. च्या फाळक्यात मारण्यात आले होते. तरीही स्फोटक पदार्थांनी पेट घेतला. तेव्हा गोदी व्यवस्थापकांनी त्या बोटीला धक्क्यांपासून दूर नेण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु, मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी नॉर्दर्नन कुम्बस यांना तो मान्य झाला नाही. कारण तसे करताना पाण्याचा चालू असलेला मारा बंद करावा लागला असता व ती आग विझवणे कठीण झाले असते. आतापर्यंत बोटीचा पत्रा तापून काळा झाला होता. आगीच्या ज्वाळांची उंची २५ ते ३० फुटांपर्यंत वाढली होती. त्यामुळे उष्णता असह्य होत होती व अग्निशमन दलाचे जवान कर्तव्याचे भान ठेवून आगीशी झुंजत होते. प्रखर उष्णता सहनशीलतेच्या मर्यादेच्या पलीकडे गेली तरीही जवान जागचे हलले नाहीत. त्यांना जहाज सोडून देण्याचा इशारा देण्यात आला होता परंतु, तो आदेश जवानांच्या कानांपर्यंत पोहोचलाच नाही. सायंकाळी ४ वाजून ५ मिनिटांनी महाभयंकर स्फोट झाला तेव्हा ११ अग्निशमन बंब क्षणात दृष्टिआड झाले. शूरवीर अग्निशमन अधिकारी व जवान आगीच्या भक्षस्थानी गेले. ८ कि.मी.च्या परिसरात असलेल्या इमारती, गोदामे भुईसपाट झाली. मलबार हिल, गिरगाव इत्यादी ठिकाणी इमारतींचा काही भाग कोसळला.
दुसरा भयंकर स्फोट
४ वाजून ३६ मिनिटांनी दुसरा भयंकर स्फोट हा फाळका नं. ५ येथे झाला. या स्फोटांमुळे जवळपासच्या वस्तू ३ हजार फुटांपर्यंत उंच अशा फेकल्या गेल्या. जळत असलेल्या कापसाच्या गासडय़ा, पेटलेली तेलाची पिंपे कित्येक दूर अंतरावर फेकली गेली. गोदीतील ३ झुलते पूल स्फोटांमुळे उडाले. आगीशी झुंज देणाऱया १५६ अग्निशमन अधिकारी व अग्नी परिचारकांपैकी ६६ जवान हुतात्मे झाले. शहरी नागरिकांची कोणतीच आकडेवारी उपलब्ध नाही. तरीही पहिल्या काही तासांत जे.जे. रुग्णालयात २६४ जखमींना दाखल करण्यात आले. नंतर आणखी ६९ जखमींची भर त्यात पडली, तर सेंट जॉर्ज रुग्णालयात २७१ जखमींना भरती करण्यात आले होते. या विध्वंसात एकंदर अंदाजे २४०8 लोकांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. सुमारे २ कोटी पौंडांची मालमत्ता उद्ध्वस्त झाली. १० महिन्यांनंतर सरकारने ८ कोटी ५० लाख रुपये नुकसानभरपाई दिली. तर १ कोटी ५० लाख मरीन्स इन्शुरन्स (विमा) देण्यात आला. लगेच दुसरे महायुद्ध संपल्यानंतर १९४६ साली मुंबई सहायक अग्निशमन सेवा बंद करण्यात आली.
१४ ते २० एप्रिल - अग्निशमन सप्ताह
मुंबई पोर्ट ट्रस्टने १ एप्रिल १९४६ पासून बी.पी.टी. ऑक्झलरी फायर सर्व्हिसची स्थापना प्रिन्सेस डॉक फायर स्टेशन येथे २ फायर प्लॉटसह करण्यात आली. त्याचवेळी मुंबई बंदराचे मुख्य फायर ऑफिसर लोबन हे होते. त्यामुळेच सरकारने अग्नि भीषणतेच्या इतिहासामध्ये घडलेल्या अग्निकांडाचे महत्त्व ओळखून १९६८ साली संसदेत विधेयक मांडले गेले व ते मंजूर होऊन १४ एप्रिल व आता १४ ते २० एप्रिल असा अग्निशमन सप्ताह पाळण्यात येतो. या सप्ताहात अग्निसुरक्षिततेबद्दल लोकांत जनजागृती करण्यात येते. १९७२ रोजी मुंबई बंदर विश्वस्तांनी व्हिक्टोरिया डॉक येथे हुतात्म्यांचे स्मारक म्हणून स्मृतिस्तंभ उभारण्यात आलेला आहे. या ठिकाणी १४ एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता देशात सर्वप्रथम या हुतात्म्यांना सर्व संबंधितांतर्फे व मुंबई अग्निशमन दलातर्फे श्रद्धांजली वाहण्यात येते.