मुंबई - देशातील दोन मोठे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे प्रचारासाठी आज महाराष्ट्रात येत आहेत. मोदी हे मुंबईत तर राहुल गांधी हे संगमनेर येथील सभेला संबोधित करतील.
मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमएमआरडीए मैदानात मोदी हे प्रचारासाठी येणार आहेत. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानात बिघाड झाल्याने आज संगमनेर येथे होणारी सभा उशिरा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केली आहे. संगमनेरमध्ये आज संध्याकाळी ६ वाजता होणारी सभा ६:३० वाजता सुरू होण्याचा शक्यता आहे. मात्र, गांधी यांच्या विमानाच्या इंजिनात आज सकाळी पाटणाकडे जाताना बिघाड झाला, त्यामुळे राहुल यांना तातडीने दिल्लीला परतावे लागले. राहुल यांनी याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली.
मुंबईच्या एमएमआरडीए मैदानाताल व्यासपीठावर पंतप्रधानांसोबत शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे, आरपीआई नेते रामदास आठवले यांच्यासह भाजप-शिवसेनेचे ६ उमेदवार उपस्थित राहणार आहे.
मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघातील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा मुंबईत घेण्यात येणार आहे.