मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या प्रतिकृतीची तसेच स्मारकाच्या जागेची पाहणी केली. त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे तसेच नवाब मलिक उपस्थित होते.
यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आव्हान म्हणून स्वीकारल्यास डॉ. आंबेडकरांचे स्मारक दोन वर्षात पूर्ण होईल, असे शरद पवार म्हणाले. भाजप सरकारच्या काळात स्मारकाला वेळ लागला; पण आता हे स्मारक पूर्ण करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जगात मोठ्या प्रमाणात बौद्ध समाज आहे. त्यामुळे मुंबईतील या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे आकर्षण राहणार असल्याचे पवारांनी सांगितले. या स्मारकासाठी मी काही सूचना केल्या नाहीत. पण मला 6 डिसेंबर आणि 14 एप्रिल या दोन तारखा समोर दिसत असल्याचे पवार म्हणाले. जगभरातल्या बौद्ध बांधवाना या स्मारकाचे आकर्षण असून बाजूलाच असलेल्या चैत्यभूमीला देखील त्याचा फायदा होणार असल्याचे पवार म्हणाले.