मुंबई - पावसाळ्यात नेहमीच मुंबईची तुंबई होते. पाणी तुंबल्यामुळे नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो. वेळप्रसंगी मुंबई ठप्प होते. पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी यावर्षी मुंबईत तब्बल 700 पंप लावण्यात आले आहे. या पंपाच्या साहाय्याने साचलेले पाणी गटार, नाल्यामार्गे समुद्रात सोडले जाणार आहे.
दरवर्षी, मुंबईत 2 हजार 500 मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद होते. मुंबईत अनेक ठिकाणी सखल भाग असल्याने पावसाळ्यात या विभागात पाणी साचते. पाणी साचल्याने वाहतूक बंद पडते, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे सेवा बंद पडते. रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद पडल्याने शहर ठप्प होते. नागरिकांच्या घरात, दुकानात पाणी शिरल्याने नुकसानही मोठ्या प्रमाणात होते.
महापालिका दरवर्षी 250 ते 300 पंप साचलेले पाणी उपसण्यासाठी वापरत होती. 26 जुलै 2005 च्या अनुभवानंतर पालिकेने हाजी अली, लव्हग्रोव्ह, क्लिव्ह लँड बंदर, इर्ला, ब्रिटानिया व गझधरबंद आदी पपिंग स्टेशनची उभारणी केली आहे. या सर्व पपिंग स्टेशनमधून सेकंदाला 6 हजार लिटर पाणी समुद्रात सोडले जाते. या प्रत्येक पंपिंग स्टेशनच्या उभारणीसाठी पालिकेने 100 कोटीहून अधिक रक्कम खर्च केली आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी सखल भाग असल्याने पाणी साचतच असते. मुंबईत हिंदमाता, किंग सर्कल, सायन, सायन स्टेशन, अंधेरी मिलन सबवे आदी विभागात थोडासा पाऊस पडला तरी पाणी साचते. तसेच मुंबईत आता अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत. या कामासाठी अनेक ठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहेत. यामुळेही पाणी साचत असल्याचे निदर्शनास आले आहे.
मुंबईत सखल भागांमध्ये रेल्वे मार्गावर आणि मेट्रो रेल्वेच्या कामांमुळे तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी एकूण 700 पंप बसवण्यात आले आहेत. यामध्ये महापालिकेच्या वतीने 330 पंप, पश्चिम रेल्वेच्या वतीने 50 पंप, मध्य रेल्वेच्या वतीने 72 आणि एमएमआरडीए व मुंबई मेट्रोच्या वतीने 254 पंप बसवण्यात आले आहेत. यासर्व पंपाद्वारे साचलेले पाणी गटार, नाल्याद्वारे समुद्रात किंवा मोकळ्या जागेत सोडून पाण्याचा निचरा केला जाणार आहे.
पाणी साचण्याचा हॉटस्पॉट हिंदमाता-मुंबईत पावसाला सुरुवात झाल्यावर सर्वात आधी दादर हिंदमाता परिसरात पाणी साचते. हिंदमाता पाणी साचण्याचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरला आहे. या विभागातील पावसाचे पाणी वाहून नेणारी गटारांची क्षमता पालिकेने वाढवली आहे. त्यामुळे या विभागात पूर्वीसारखे पाणी साचणार नाही, असा दावा पालिकेने केला आहे. पाणी साचले तरी आधीपेक्षा अधिक गतीने त्याचा निचरा होईल, अशी माहिती पालिकेने दिली आहे.
पालिका प्रशासन सज्ज - मुंबईची रचना बशीसारखी असल्याने काही ठिकाणी सखल भागात पाणी साचते. साचलेल्या पाण्याचा निचरा जलद करता यावा, यासाठी पंप बसवण्यात आले आहेत. नालेसफाई योग्य प्रकारे झाली आहे. मुंबईकरांना पावसाळ्यात त्रास होऊ नये, त्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे.
कोणी किती लावले पंप -
- मुंबई महापालिका - 330
- एमएमआरडीए मेट्रो - 245
- मध्य रेल्वे - 72
- पश्चिम रेल्वे - 50
- एकूण 697 पंप