मुंबई - राज्यात एकीकडे एनसीबी विरुद्ध राज्य सरकार वाद सुरू असताना मुंबई पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी पथक मोठ्या प्रमाणात कारवाया करताना दिसत आहे. मुंबई युनिट 1 पथकाने 1 कोटी किमतीचे हेरॉइन जप्त केले आहे. या प्रकरणात एका 24 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. आजाद मैदान पोलीस युनिट 1अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
आझाद मैदान पोलीस युनिटकडून जेजे हॉस्पीटलजवळ गस्त घातली जात असताना एक महिला पोलिसांची गाडी बघून पळून जाताना दिसली. तातडीने त्या महिलेचा पाठलाग करत तिला ताब्यात घेण्यात आले. महिलेची तपासणी केली असता तिच्याकडे 334 ग्राम हेरॉईन आढळले. ते जप्त करण्यात आले आहे. आरोपी महिलेवर एनडीपीएस कायद्याच्या कलम 8 (क) सह 21 (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे आझाद मैदान युनिटमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धराम म्हेत्रे, पोलीस उपनिरीक्षक अमित देवकर, पोलीस उपनिरीक्षक मानसिंग काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.