मुंबई - मुंबई, नवी मुंबईला जलमार्गाने जोडणारी वॉटर टॅक्सी सेवा येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. मात्र, वॉटर टॅक्सी पकडण्यासाठी भाऊचा धक्का येथील डोमेस्टिक क्रुझ टर्मिनलपर्यंत नागरिकांना पोहचण्यासाठी पुरेशी वाहतूक व्यस्था नाही. त्यामुळे, इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेस कंपनी नागरिकांना डोमेस्टीक क्रुझ टर्मिनलपर्यंत पोहचण्यासाठी मुंबईतील विविध ठिकाणी २०० टॅक्सी सेवा आणि बेस्ट उपक्रमाच्या बसेस उपलब्ध करून देणार आहे. यामुळे नागरिकांना वॉटर टॅक्सीतून बाहेर पडल्यावर किंवा वॉटर टॅक्सी गाठण्यासाठी प्रवाशांना स्थानिक टॅक्सीची मदत होणार आहे.
हेही वाचा - Schools Closed : मोठा निर्णय.. राज्यात 'या' दोन शहरातील शाळा बंद.. पुन्हा एकदा ऑनलाईन शिक्षण सुरु
६ ठिकाणी टॅक्सी सेवा उपलब्ध होणार -
सागरमाला उपक्रमांतर्गत देशातील समुद्रकिनार्यांचा उपयोग करून जलवाहतुकीला प्राधान्य देण्याची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने आखली आहे. त्या माध्यमातून मुंबईच्या नजिकच्या शहरांना जलमार्गाने जोडणारी वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा सरकारने केली होती. त्यानुसार आता मुंबई ते बेलापूर दरम्यान वॉटर टॅक्सी येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे.
विशेष म्हणजे, ही योजना मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि सिडको मिळून राबवत आहे. वॉटर टॅक्सी सेवा चालविण्याची जबाबदारी इन्फिनिटी हार्बर सर्व्हिस कंपनीला दिली आहे. मुंबई डोमेस्टिक क्रुझ टर्मिनल ते बेलापूर ते नेरूळ ते डोमेस्टिक क्रुझ टर्मिनल या मार्गांवर वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. मात्र, दक्षिण मुंबईतील भाऊचा धक्का येथील डोमेस्टिक क्रुझ टर्मिनलपर्यंत पोहचण्यासाठी कंपनीकडून मुंबईतील विविध ६ ठिकाणी टॅक्सी सेवा उपलब्ध केली जाणार आहे, अशी माहिती इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय भागीदार सोहेल कझानी यांनी दिली.
या ठिकाणी असणार टॅक्सी उपलब्ध -
गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, चर्चगेट, कुलाबा, सीएसएमटी आणि डोमेस्टिक क्रुझ टर्मिनल या ठिकाणी टॅक्सी उपलब्ध असणार आहे. या प्रत्येक ठिकाणी किमान २० टॅक्सी चालक प्रवाशांना स्थानिक पातळीवर वाहतुकीसाठी मदत करतील. या शिवाय नवी मुंबईतील वाशी, नेरूळ आणि बेलापूर या ठिकाणीही वॉटर टॅक्सीतून बाहेर पडल्यावर किंवा वॉटर टॅक्सी गाठण्यासाठी प्रवाशांना स्थानिक टॅक्सींची मदत मिळणार आहे. यासाठी जवळ जवळ 200 टॅक्सी चालकांशी चर्चा झाली आहे. या शिवाय बेस्ट उपक्रमाच्या बसेसही नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती सोहेल कझानी यांनी दिली.
उद्घाटनानंतरच बुकिंग सुरू -
मुंबई ते नवी मुंबई अशी वॉटर टॅक्सी सेवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचा प्रारंभ होणार असल्याने आता त्यांच्या वेळेसाठी उद्घाटन थांबले आहे. परिणामी, १० ते १४ जानेवारी या कालावधीत पंतप्रधानांच्या हस्ते वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Darekar on disqualification : देशातील मजुरांनी श्रीमंत होऊ नये का? प्रवीण दरेकर