मुंबई - रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने आज पवई इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पवई तलाव येथे झाडांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. परिसरात वृक्षारोपण करत झाडाची वाढ झाली पाहिजे अशी शपथ विद्यार्थ्यांनी यावेळी घेतली.
भावाने नेहमी आपली रक्षा करावी म्हणून बहीण भावाला राखी बांधत असते. अशाच प्रकारे वृक्ष देखील मनुष्याची रक्षा करतात. प्राणवायू देतात, सावली देतात. या बाबतची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पवई तलाव येथील झाडांना राख्या बांधून आज विद्यार्थ्यांनी अनोखे रक्षाबंधन साजरे केले. पवई इंग्लिश हायस्कुलच्या विद्यार्थ्यांमार्फत पवई तलाव, स्काऊट उद्यानाजवळ झाडांना राख्या बांधण्यात आल्या. वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान ही घेण्यात आले. या वेळी निसर्ग संवर्धनाची विविध गाणी आणि फलक यांद्वारे विद्यार्थ्यांनी जनजागृती देखील केली.