मुंबई - मुंबई नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने मुंबईत दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये 445 ग्रॅम हायड्रोपोनिक अल्प प्रमाणात कोकेन आणि 2 लाख 96 हजारांची रोकड जप्त केली आहे. 06 मे आणि 07 मे रोजी या दोन कारवाया करण्यात आल्या. या कारवाईमध्ये तीन आरोपींवर एनडीपीएस कलम नुसार गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
रिसीव्हरच्या घरावर छापा - पहिल्या कारवाईत मिळालेल्या माहितीच्या आधारावर 225 ग्रॅम हायड्रोपोनिक 6 मे रोजी मुंबईच्या परदेशी पोस्ट ऑफिसमध्ये जप्त करण्यात आला. हे पार्सल कॅनडातून इनबाउंड होतं. याप्रकरणाचा पुढे पाठपुरावा करताना एनसीबी मुंबईच्या पथकानं 7 मे रोजी रात्री उशिरा मालाड येथे रिसीव्हरच्या घरावर छापा टाकून 220 ग्रॅम हायड्रोपोनिक सह 2 लाख 96 हजारांची रोकड जप्त केली. एनसीबी मुंबईनं याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
जीन्सच्या पँटमध्ये ड्रग्स - मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे दुसऱ्या कारवाईत एनसीबी मुंबईनं मिरा रोड पूर्व येथे अल्प प्रमाणात कोकेन जप्त केलं आणि 6 मे रोजी सदर खेप स्विकारणाऱ्याला अटक केली. घटनास्थळी चौकशीच्या आधारे एनसीबी बंगळुरूच्या पथकानं बंगळुरू येथे रिसीव्हरसाठी सापळा रचला. या कारवाईत अल्प प्रमाणात कोकेनसह एका आफ्रिकन पुरुषाला पकडण्यात एनसीबीच्या पथकाला यश आलं आहे. ड्रग्स जीन्सच्या पँटमध्ये विणलेल्या कुरिअरमध्ये आली होती. एनसीबी मुंबईनं याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांच्या नेतृत्त्वात एनसीबीच्या पथकानं कारवाई केली होती.