मुंबई - मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचा ( Mumbai MNC Budget 2022 - 23 ) अर्थसंकल्प उद्या (गुरुवारी ३ फेब्रुवारीला) सादर केला जाणार आहे. मागील वर्षी ३९ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. सन २०२२ - २३ चा अर्थसंकल्प सुमारे ४१ हजार कोटींच्या दरम्यान असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्याचा अर्थसंकल्प ऑनलाईन पद्धतीने सादर केला जाणार आहे. पालिकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा व ऑनलाईनपद्धतीने सादर होणारा अर्थसंकल्प असणार आहे.
हेही वाचा - राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'हे' महत्वाचे निर्णय
सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर होणार -
मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान कोरोनाच्या तीन लाटा आल्या आहेत. कोरोनाच्या दोन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. तर तिसरी लाट आटोक्यात आली आहे. कोरोनाचा सामना करताना सर्वात श्रीमंत अशी महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेने २०२१ - २२ चा ३९ हजार ०३८ कोटींचा मेगा बजेट सादर केला होता. यामधील डिसेंबर २०२१ पर्यंत ४६ टक्के रक्कम खर्च करण्यात महापालिकेला यश आले आहे. मागील अर्थसंकल्पातील निधी खर्च झाला नसला तरी, महापालिकेची निवडणूक असल्याने मुंबईकरांसाठी नव्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता असल्याने अर्थसंकल्पात वाढ होऊन तो सुमारे ४१ हजार कोटींच्या दरम्यान असेल अशी माहिती मिळत आहे.
या खर्चाला प्राधान्य देण्यात येईल -
मुंबईमधील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सन २०२२ - २३ चा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यात आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि कोस्टल रोड म्हणजेच किनारपट्टीच्या रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधांशी संबंधित महत्त्वाच्या विभागांवरील खर्चाला प्राधान्य देण्यात येईल. तसेच, भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता समुद्राचे पाणी गोडे करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून, यासाठी मोठी तरतूद करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे समोर आले. त्यामुळे, दवाखान्यांच्या संंख्येत वाढ, मोठ्या रुग्णालयांचा विस्तार यांसह येणाऱ्या रुग्णांसाठी योग्य व उत्तम आरोग्य व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क असून सन २०२१ - २२ या वर्षांसाठी २,९४५.७८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तर, यंदा सन २०२२ - २३ या वर्षांसाठी भरीव तरतूद करण्यात येणार आहे
गेल्या दोन वर्षांतील अर्थसंकल्प -
पालिकेचा २०२० - २०२१ चा ३३ हजार ४४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. गेल्या वर्षी २०२१ - २२ च्या अर्थसंकल्पात नव्या प्रकल्पांसह मोठ्या विकास योजनांसाठी १६.७४ टक्क्यांची वाढ होऊन ३९ हजार ०३८ कोटींचा मेगा बजेट सादर करण्यात आले होते. सन २०२२ - २३ च्या अर्थसंकल्पात दोन हजार कोटींची वाढ होत ४१ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता असून मुंबईकरांना अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध करण्यावर यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
यासाठी तरतूद केली जाण्याची शक्यता -
* विविध विषाणूंचा अभ्यास करण्यासाठी विशेष रुग्णालये.
* पालिकेच्या दवाखान्यांची संख्या वाढवत संध्याकाळच्या वेळेतही सुरूच राहणार.
* नद्यांचे सौंदर्यीकरण, मिठी नदीमध्ये बोटिंग.
* सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या नव्या शाळा.
* कचऱ्याची विल्हेवाट प्रकल्प, कचर्यापासून वीज प्रकल्प.
* पर्यटनाला चालना देण्यासाठी योजना, पर्यावण संवर्धन उपक्रम.
* उत्पन्न वाढीसाठी नवीन स्तोत्र निर्माण करणे.
* पुलांच्या मजबुतीसाठी, नवीन पुलांसाठी विशेष निधी.
* मुंबईत सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे.