मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आठवा स्मृतिदिन आज आहे. यानिमित्त कोरोनारुपी संकट मुंबई, महाराष्ट्र देशातून साता समुद्रापार जाऊ दे, मुंबईकरांचे आरोग्य चांगले राहू दे, अशी प्रार्थना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलीय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील शक्तीस्थळावर जावून त्यांनी आज आदरांजली वाहिली.
आणि मी महापौर झाले...
बाळासाहेब ठाकरे यांचा आठवा स्मृतिदिन आज आहे. या निमित्ताने महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना मागील वर्षी याच दिवशी (17 नोव्हेंबर) मला मुंबईचे महापौर पद मिळू दे, अशी मागणी बाळासाहेबांच्या शक्तीस्थळावर नतमस्तक होऊन केली होती. 18 नोव्हेंबरला माझ्या नावाची घोषणा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. 22 डिसेंबरला मी महापौर झाल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
कोरोना सातासमुद्रपार जाऊ दे -
बाळासाहेब नेहमी माझा मुख्यमंत्री शिवाजी पार्कवर येऊन शपथ घेईल असे म्हणत. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि बाळासाहेबांच्या शक्तीस्थळाजवळ घेतली. यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. यामधून सर्वांचे आरोग्य चांगले राहू दे आणि कोरोना विषाणू साता समुद्रपार जाऊ दे, अशी प्रार्थना महापौरांनी बाळासाहेबांच्या शक्तीस्थळाजवळ केली आहे. मुंबईकरांनी कोरोनाबाबतच्या मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे आणि सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे या नियमांचे पालन करावे असे आवाहन महापौरांनी केले आहे.
राज्यभरातून शिवसैनिक शक्तीस्थळावर येणार
शिवसैनिक बाळासाहेबांना आपले दैवत मानतात. त्यामुळे आज त्यांच्या स्मृतिदिना निमित्ताने राज्यभरातुन मोठ्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल होतील असा अंदाज आहे. राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यानंतर होत असलेला बाळासाहेबांचा हा पहिला स्मृतिदिन आहे. शिवाजी पार्कवर शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा एकदा शपथ घेईल अशी इच्छा बाळासाहेबांची होती. ती इच्छा पुर्ण झाली आहे. त्यामुळे हिच खरी बाळासाहेबांना आदरांजली असल्याची भावना शिवसैनिकांत आहे.
असाल तेथून करा अभिवादन
17 नोव्हेंबर 2012 ला बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. त्यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याठिकाणी शक्तीस्थळ निर्माण करण्यात आले आहे. या ठिकाणी दरवर्षी शिवसैनिक बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त असाल तेथून शिवसैनिकांनी व इतर नागरिकांनी अभिवादन करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. शिस्त आणि शिस्तीचे पालन करा हेच बाळासाहेबांना खरे अभिवादन आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.