मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला असून गेले पाच महिने महापालिका कोरोनाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. मुंबईत कोरोनाचे 1700 रुग्ण दररोज आढळून येत होते. पालिकेने ही संख्या 900 ते 1200 पर्यंत आणली होती. मात्र, सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. 2 सप्टेंबरला 1622, 3 सप्टेंबरला 1526, 4 सप्टेंबरला 1929, 5 सप्टेंबरला 1735, 6 सप्टेंबरला 1910 तर सोमवारी 1788 रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.
मुंबईत सोमवारी कोरोनाचे 1788 नवे रुग्ण आढळून आले असून 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 25 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 21 पुरुष तर 10 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 57 हजार 410 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 7 हजार 897 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1541 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 25 हजार 019 वर गेला आहे. सध्या मुंबईत 24 हजार 144 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 67 दिवस तर सरासरी दर 1.03 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 573 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 6 हजार 825 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 8 लाख 34 हजार 344 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.