मुंबई - सीमेवर दुश्मनांचे वाकडे डोळे बाहेर काढण्यासाठी सैन्य, हवाईदल आहे. मात्र, कोरोनामुळे देशात भूकबळी व बेरोजगारीचे संकट तसेच आर्थिक मंदीचा राक्षस धुमाकूळ घालतो आहे. त्याच्याशी मुकाबला कसा करणार, असा प्रश्न शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.
एकीकडे कोट्यवधी चुली विझताना दिसत आहेत. त्याचवेळी घरात भुकेचा आगडोंब उसळत आहे. मात्र, जागतिक अर्थव्यवस्थेस गती देण्याचे सामर्थ्य हिंदुस्तानात असल्याचे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवताना व्यक्त केले. त्यामुळे 'जगाचे राहू द्या साहेब, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या', असे म्हणत सामनाच्या अग्रलेखातून सद्यपरिस्थितीवर केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे.
बेरोजगारी व भूकमरी हे संकट आजही घरात निपचीत पडून आहे. ते पोटाची आग घेऊन घराबाहेर पडल्यानंतर स्वदेशी संकटाचा सामना करण्यासाठी सैन्याला पाचारण करण्याची चिंता आम्हाला सतावत आहे, अशी भीती देखील शिवसेनेने व्यक्त केली आहे.
कोरोना काश्मीर आणि 'मंदिर'
हिंदुस्तानचा 74 वा स्वातंत्र्यदिन कोरोनामय होता. पंतप्रधानांपासून सर्व मुख्यमंत्र्यांची भाषणे आरोग्य सुविधांवर भर देणारी आहेत. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून लाल किल्ल्यावरून जे भाषण केले, ते याच पद्धतीचे होते. पाकिस्तानने किंवा चीनला त्यांचे नाव न घेता इशारा वगैरे देण्याचे सोपस्कारत्यांनी पार पडले. ते नित्याचेच क्रियाकर्म आहे. चीन अद्याप आपल्या भूमीत घुसलेलाच आहे. पाकिस्तानचे शेपूट वाकडेच आहे. जम्मू-काश्मीरात जवानांची बलिदाने आणि भाजप कार्यकर्त्यांवर हत्या थांबलेल्या नाहीत. समाधानाची बाब जम्मू काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकांमध्ये डौलाने तिरंगा फडकला आहे. 370 कलम हटवण्याचा हा परिणाम आहे.
हे मान्य केले तरी तेथे रक्तप्रवाह थांबला नाही. भयही संपलेले नाही. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच निवडणूक होण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. या घोषणेसाठी त्यांनी लाल किल्ल्याची निवड केली. निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेश भाजप नेते मनोज सिन्हा यांना जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून तडकाफडकी पाठवले, तेव्हाच या राजकीय हालचालींचा अंदाज आला होता, असे देखील अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
पंतप्रधानांचे भाषण सर्वसमावेशक होते. कोरोनामुळे समोर गर्दी कमी होती. त्यामुळे प्रमुख मंडळींच्या चेहऱ्यावरचे भाव समजणे कठीण होते. पण पंतप्रधानांचा आवेश जोश कमी झाला नव्हता. मुलींच्या विवाह वयात बदल करण्याबाबत त्यांनी लाल किल्ल्यावरून सूतोवाच केले. आयोध्याप्रश्नी देशवासीयांचा संयम व शहाणपण वाखाणण्यासारखा असल्याची टिचकीही पंतप्रधानांनी मारली.
हे सर्व महत्वाचे असले तरी पंतप्रधानांच्या भाषणाचे कूळ व मूळ आरोग्यविषयक राष्ट्रीय धोरणच होते. कोरोना महामारी वरप्रभावी इलाज ठरणाऱ्या एक नव्हे तीन-तीन लसींच्या परीक्षणाची प्रक्रिया हिंदुस्तानात सुरू असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली आहे. देशात कोरोनाचा कहर झाला आहे. गेल्या 24 तासात 63 हजार 489 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर हजाराच्या आसपास लोक काल दिवसभरात मरण पावले. एका दिवसातला हा आक्रोश आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 25 लाखांवर पोहोचली आहे. आतापर्यंत 50 हजारांवर लोक या महामारीत मरण पावले, हे चित्र धक्कादायक आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी लस येत आहे, असे लाल किल्ल्यावर सांगणे हे आशादायक आहे.
रशिया, माकडे आणि बेरोजगारी
रशियाने सगळ्यात आधी ही लस आणली, त्या लसीवर जागतिक स्तरावर टीकाटिप्पणी सुरू आहे. त्याने निर्माण केलेली लस ही तेथील माकडांनाही टोचायच्या लायकीची नाही, अशी खिल्ली अमेरिकेने उडवली. माकडांचे राहू द्या. पण कोरोनामुळे माणसे किडा मुंग्यांसारखी मरत आहेत. आज सगळ्यात जास्त कोरोनाग्रस्त लोक अमेरिका व आपल्या देशात तडफडताना दिसत आहेत. रशियाची लस माकडांच्या लायकीची नसेलही. मग माणसांच्या लायकीची लस बाजारात आणा व मृत्यूचे तांडव थांबवा असे त्यांनी केंद्र सरकारला म्हटले. पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेल्या लसी जोपर्यंत बाजारात येत नाही, तोपर्यंत हिंदुस्थानातील भय संपणार नाही. प्रत्येक नागरिकाला डिजिटल हेल्थ कार्ड दिले जाईल, 'नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन'ची स्थापना होईल असे पंतप्रधानांनी जाहीर केले. या आरोग्य ओळखपत्रात डॉक्टरांच्या भेटीपासून ते औषधोपचारापर्यंत सर्व काही असेल. हे सर्व डिजिटल प्रकरण छानच असावे. पण आजच्या कोरोना महामारीने देशासमोरच्या आर्थिक महासंकट उभे केले आहे उभे राहिले आहे त्याचे काय? असा सवाल करत फक्त आत्मनिर्भर होण्याचे ढोल वाजवत प्रश्न सुटेल असे वाटत नाही, अशी टीका केंद्र सरकारवर केली आहे.
आता पर्यंत देशात 14 कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे. भविष्यात हा आकडा वाढेल. लोकांना घराबाहेर पडायचे आहे पण घराबाहेर पडून करायचे काय? नोकरी धंदा रोजगार गेला आहे. त्यांच्या भविष्यावर पंतप्रधानांनी भाष्य केले असते, तर बरे झाले असते, असे सामनातून सांगण्यात आले आहे.