मुंबई - राष्ट्रवादीचा गड आणि शरद पवार यांचे राजकीय प्राबल्य असलेल्या बारामती मतदार संघात १९ एप्रिलला पंतप्रधान मोदी यांनी सभा घेणे टाळले आहे. त्याऐवजी आता बारामतीत अमित शाह यांची सभा होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
मोदी यांची १७ तारखेला माढा मतदार संघात सभा होणार आहे. याच वेळी त्यांची बारामतीत भाजपच्या उमेदवार कांचन कुल याच्या प्रचारासाठीही सभा होणार असल्याची जोरदार चर्चा होती. पण ही चर्चा मावळली असून शाह यांची सभा बारामतीत होणार असल्याची माहिती मिळत आहे.
पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले असून दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मोदी यांनी लक्ष केले असले तरी पवारांच्या बारामतीत मोदी यांची सभा होणार नाही. मात्र, भाजप अध्यक्ष अमित शाह पवार यांच्या विरोधात आवाज बुलंद करणार आहेत.
मोदी लाटेतही बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार रासपचे महादेव जानकर यांचा सत्तर हजार मतांनी पराभव केला होता. मोदी लाटेत सुळे यांचे मताधिक्य घटले होते. त्यांनी केवळ ७० हजार मतांनी जानकर यांचा पराभव केला होता. यामुळे भाजपच्या आशा अजूनही पल्लवित असून या मतदार संघात प्रचारासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील तळ ठोकून आहेत. मात्र, या मतदार संघात मोदी यांच्या सभेला कितपत प्रतिसाद मिळेल याबाबत भाजपच्या नेत्यांना साशंकता असल्यानेच मोदी यांची सभा घेण्याचे धाडस भाजप करत नसल्याचे चर्चिले जात आहे.