मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील वातावरण तापले होते. राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आली होती. तर काही ठिकाणी भाजपा आणि शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने आले होते. अधिकारी कार्यकर्त्यांनी गर्दी केल्यामुळे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन देखील झाले होते. कालच्या घडामोडीवरती मनसेने टीका केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उपरोधिक ट्वीट करत कालच्या भानगडीमुळे महाराष्ट्राला काय फायदे झाले? हे सांगितले आहे.
पत्रकार विसरले...
संदीप देशपांडे यांनी ट्वीट करून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘डेल्टा, डेल्टा प्लस अस काही नसतं. घरचंच आंदोलन होतं, त्यामुळे आपल्यावर खापर फुटू नये म्हणून तिसऱ्या लाटेला सुट्टी. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा पत्रकार विसरले. आता आपण कोरोनाच्या “कानात” आत्मविश्वासाने सांगू शकतो तू संपलास.’ असे ट्विट त्यांनी केले आहे. काल देखील देशपांडे यांनी झालेल्या निदर्शने विरोधात टीका केली होती. आज सकाळपासून महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था “फाट्यावर” मारून आंदोलन आणि गर्दी जमवली जात आहे. कुठेही सोशल डिस्टन्सिंग नाही. गर्दीच गर्दी असून “कोरोना हृदय सम्राट”गप्प का? आणि हो, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा म्हणणारे पत्रकार आज तो शब्द विसरून हा आक्रमक तो आक्रमक म्हणत आहे, अशी टीका देशपांडे यांनी काल शिवसेनेवर टीका केली होती. आज पुन्हा देशपांडे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.