मुंबई - वूहानच्या धर्तीवर मुंबईतील बीकेसीतील एमएमआरडीए मैदानामध्ये पहिले नॉन क्रिटिकल कोव्हिड हॉस्पिटल बांधून पूर्ण झाले आहे. हे हॉस्पिटल उद्या(सोमवारी) मुंबई महानगर पालिकेकडे हस्तांतरीत केले जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)चे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी याबाबतची माहिती दिली. तसेच याच हॉस्पिटलचा विस्तार करत आणखी 1 हजार बेड वाढवण्याच्या कामाला सुरुवात केल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
राज्यात कोरोना महामारीने बाधित होणाऱ्या रुग्णांचा आकडा सर्वाधित मुंबई शहरामध्ये आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क होते. रुग्णांच्या सोयीसाठी या रुग्णालयाच्या निर्मितीचे काम हाती घेतले. केवळ 15 दिवसाच्या काळात एमएमआरडीएने तब्बल 1008 बेडचे नॉन क्रिटिकल कोव्हिड हॉस्पिटल बांधून पूर्ण केले आहे. दोन दिवसापूर्वीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: या रुग्णालायची पाहणी केली आहे.
या हॉस्पिटलमध्ये आता सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना उपचार देण्यात येणार आहेत. उद्या हे हॉस्पिटल पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. त्यानंतर या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनापासून पुढे सर्व जबाबदारी पालिकेची असणार आहे. 1008 बेडचे काम पूर्ण होत असतानाच आता एमएमआरडीएकडे आणखी 1000 बेडच्या विस्तारीकरणाची जबाबदारी आली आहे. त्यानुसार 1008 बेडच्या हॉस्पिटललगतच नव्या 1000 बेडच्या हॉस्पिटल च्या कामाला आजपासूनच सुरुवात करण्यात आली.
या हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेडही उपलब्ध असणार आहेत, हे काम पुढच्या 15 दिवसात पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. तर या विस्तारामुळे मुंबईतील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास नक्कीच मदत होईल, असे म्हटले जात आहे.