मुंबई - राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. मात्र, जनता हुशार असून राज्यात सुडाचे राजकारण कोण करतंय हे जनतेला चांगलंच माहिती आहे, असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला लगावला. एकनाथ खडसे यांची सकाळपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. मात्र, या आधीही भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी झोटिंग कमिटीने दिलेल्या रिपोर्टनुसार एकनाथ खडसे यांना क्लिनचिट देण्यात आली होती. मात्र, तरीही आज त्यांची पुन्हा चौकशी केली जातेय. एकनाथ खडसे यांच्या जावयांना ईडीकडून अटक करण्यात आली, तर त्यांची सकाळपासून चौकशी सुरू आहे. महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याला ही वागणूक देणे चुकीचे असल्याचं जयंत पाटील म्हणाले.
हेही वाचा - राणेंना पंतप्रधान केले तरी कोकणातून शिवसेनेला हटवण्याच्या कोणाच्या ऐपतीत नाही - विनायक राऊत
एकनाथ खडसेप्रमाणेच महाराष्ट्रातल्या इतरही ज्येष्ठ नेत्यांना अशीच वागणूक देण्याचा प्रयत्न केला गेला तर, महाराष्ट्रातली जनता हे खपवून घेणार नाही. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना माझी विनंती आहे, सुडाचे राजकारण करू नका. राज्यातील ठराविक नेत्यांना भाजपकडून टार्गेट केले जात आहे हे लोकांना आवडत नाही. गुन्हा झाला असेल तर, कोर्टात जा आणि कोर्टात तो गुन्हा सिद्ध करा, अशी विनंती जयंत पाटील यांनी भाजपच्या नेत्यांना केली.
- काँग्रेस-राष्ट्रवादीमधून गेलेली लोकं मंत्रिमंडळात -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. मात्र, हा विस्तार करत असताना, जे मूळ भाजपची लोकं आहेत, त्यांना मंत्रिमंडळात सामावून न घेता काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून गेलेल्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाते. प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद ही भाजपचे नेते आहेत. मात्र, त्यांनाही डावलण्यात आलंय. त्यामुळे भाजप महाराष्ट्रात किती कमकुवत आहे हे त्याने सिद्ध होतं, असा टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रातील 'त्या' मंत्र्यांना का दिला डच्चू, माजी मंत्र्यांचे पुनर्वसन होणार?