मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील विविध १४ संवर्गातील ५६५ रिक्त पदे भरण्यासाठी, जीए सॉफ्टवेअर या कंपनीची निवड करण्यात आली होती. या कंपनीच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याने गुप्ततेचा भंग करत पेपर फोडण्याचा कट रचल्याचे समोर आले. म्हाडाने लगेच १२ ते २० डिसेंबर या कालावधीत आयोजित केलेली परीक्षा ऐनवेळी रद्द केली. म्हाडा भरती परीक्षेत गैरव्यवहार करणाऱ्या जी.एस कंपनीचा करार रद्द करण्यात आला. या वादावर पडदा टाकण्यासाठी गृहनिर्माण मंत्र्यांनी भरती परीक्षा म्हाडा स्वतः घेईल असे जाहीर केले. मात्र म्हाडा प्रशासनामार्फत पावणे तीन लाख उमेदवारांची परीक्षा घेणे अशक्य असल्याने अखेर विविध परीक्षांचा अनुभव असलेल्या टीसीएस कंपनीमार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
संकेतस्थळावर तपशीलवार माहिती
यापूर्वी भरती परीक्षा ऑफलाइन पद्धतीने रविवार (१२ डिसेंबर), बुधवार (१५ डिसेंबर), रविवार (१९ डिसेंबर) आणि सोमवार (२० डिसेंबर) अशा चार टप्प्यांत घेण्यात येणार होती. मात्र, सचिवांनी पुढील तारीख न सांगता परीक्षा पुढे ढकलल्याची घोषणा केली होती. अखेरच्या क्षणी स्थगितीच्या निर्णयावर विद्यार्थ्यांनी नाराजी आणि संताप व्यक्त केला होता. उमेदवारांची मते लक्षात घेऊन म्हाडाने अखेर १ ते १५ फेब्रुवारी दरम्यान ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक व अन्य सूचना म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील, असे म्हाडाने अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा : MAHA TET 2021 Corruption : औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक