मुंबई - स्वतंत्र विद्यापीठासाठी कोकणातील सर्व महाविद्यालये सकारात्मक आहेत. शिक्षणप्रेमींकडूनही स्वतंत्र विद्यापीठाच्या मागणीला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. त्यामुळे सोलापूर, नांदेड, गडचिरोली, जळगावच्या धर्तीवर मुंबई विद्यापिठाचे विभाजन करून कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकणचे नेते आमदार भास्करराव जाधव यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शुक्रवारी विधानसभेत केली.
७६४ महाविद्यालये संलग्न असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनावर कमालीचा ताण पडत आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या कार्यक्षमतेविषयी सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पेपरफुटीचे अनेक प्रकार, उशीरा लागणारे निकाल, प्रमाणपत्र मिळण्यास होत असलेला विलंब आणि परीक्षांच्या ऑनलाईन निकालांमध्ये प्रचंड गोंधळ झाल्याने विद्यापीठाची अक्षरशः बेअब्रू झाली आहे, असेही भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले.
या सर्व प्रकारांमुळे सध्या मुंबई विद्यापीठात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा फटका कोकणातील विद्यार्थ्यांना बसला असून हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी कोकणातील शिक्षणप्रेमी नागरिक, संस्था आणि विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.