मुंबई - कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता मुंबईमधील मेट्रो बंद करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळात विचाराधीन आहे. या संभाव्य निर्णयाचे मेट्रो प्रवाशांकडून मात्र स्वागत करण्यात येत आहे. कोरोनामुळे घाटकोपर मेट्रो स्थानकावर आज (मंगळवार) रोजच्या रहदारीपेक्षा शुकशुकाट दिसून आला. यावेळी संभाव्य मेट्रो बंद निर्णयाबाबत प्रवाशांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे.
कोरोनाचा प्रभाव रोखण्यात मेट्रो बंद करण्यात आली, तर स्वागतच आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता मुंबईमधील मेट्रो बंद करण्यात येणार असेल, तर त्याला पाठिंबा आहे. अशा शब्दात मेट्रो प्रवाशांकडून संभाव्य निर्णयाचे समर्थन करण्यात येत आहे.
हेही वाचा... कोरोना इफेक्ट : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज चालणार फक्त 2 तास
देशात कोरोना विषाणूचा विळखा वाढत असताना त्याचे सर्वात जास्त रुग्ण राज्यात आढळून आले आहेत. यातच मुंबई शहरामध्ये तेरा रुग्ण असून एका संशयित रुग्णाचा आज (मंगळवार) सकाळीच मृत्यू झाला. ही बातमी सर्वत्र पसरताच नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. मुंबईतील वाहतुकीसाठी दुसरी महत्त्वाची सेवा असलेली घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो येथे विषाणूचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकारकडून काही काळासाठी मेट्रे बंद केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
दररोज मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याबाबत, 'जर या विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र होऊन साथ मोठ्या प्रमाणात शहरात पसरत असेल, तर मेट्रो बंद केलेले चांगले आहे' असे म्हटले. तर काही प्रवाशांनी मेट्रो बंद केली तर रोज मजुरी करणाऱ्या लोकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागेल, याबाबत काळजी व्यक्त केली. अशावेळी शासनाने पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी, अशी मागणी केली आहे.