मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवारी 13 मार्च 2022 रोजी मेगाब्लॉक ( Mega Block On Central Railway ) घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन मार्गावर, हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते गोरेगाव अप-डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे मेगाब्लॉक -
मध्य रेल्वेमार्गावरील ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सकाळी 8.16 ते सायंकाळी 4.17 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबवल्या जातील. या सर्व सेवा त्यांच्या नियोजित आगमना पेक्षा 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोचतील. कल्याण येथून सकाळी 8.10 ते सायंकाळी 4.58 पर्यत सुटणाऱ्या अप जलद/ अर्ध जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा त्यांच्या नियोजीत आगमनापेक्षा 10 मिनिटे उशिराने आपल्या गंतव्यस्थानांवर पोहोचतील.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक -
हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई येथून सकाळी 10.34 ते सायंकाळी 3.54 पर्यत वाशी/बेलापूर/पनवेलकरिता सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल बेलापूर वाशी येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत सीएसएमटी मुंबई अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी आणि कुर्ला तसेच पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक -
रेल्वे रूळ सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी पश्चिम रेल्वेवर मार्गावर सांताक्रुज ते गोरेगाव स्थानकाच्या अप-डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. हा मेगाब्लॉक सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. या ब्लॉक कालावधीत सांताक्रुज ते गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील, तर विलेपार्ले येथे फलाट क्रमांक 5/6 अरुंद असल्याने लोकलला डबल हॉल देण्यात येईल. तर राम मंदिर स्थानकाला जलद मार्गाचे फलाट नसल्याने दोन्ही दिशेकडील लोकल थांबणार नाही. ब्लॉकमध्ये काही लोकल सेवा रद्द करण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.
हेही वाचा - Narendra Modi Dinner With Mother : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आईची भेट, सोबतच केले जेवण