मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवारी (19 सप्टेंबर) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर मुंबई सेंट्रल ते माहीम रेल्वे स्थानकादरम्यान रात्रकालीन मेगाब्लॉग असणार आहे. रविवारी अनंत चतुर्दशी असल्यामुळे मुंबईकर बापाच्या विसर्जनासाठी घराबाहेर पडणार आहे. मात्र, रविवारी मेगाब्लॉक घातल्यामुळे गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे.
हेही वाचा - राज्यात शुक्रवारी ३५८६ नवे कोरोनाबाधित; ६७ मृत्यू
- मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक-
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.४४ या वेळेत सुटणारी डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील व त्यांच्या वेळापत्रकानुसार निर्धारित स्थानकांवर थांबवण्यात येतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि त्यांच्या वेळापत्रकापेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाणे येथून सकाळी १०.४६ ते दुपारी ३.२६ पर्यंत सुटणारी अप जलद सेवा मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील व त्यांच्या वेळापत्रकानुसार निर्धारित स्थानकांवर थांबवण्यात येतील. पुढे या अप जलद सेवा माटुंगा येथे अप जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि वेळापत्रकापेक्षा १५ मिनिटे उशीराने गतव्यस्थानी पोहोचतील.
- हार्बर मार्गावर मेगाब्लॉक-
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला आणि वाशी - पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
- रात्रकालीन मेगाब्लॉक-
पश्चिम रेल्वे मार्गावर माहिम ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान अप जलद आणि पाचव्या मार्गिकेवर शनिवारी-रविवारच्या रात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत अप जलद मार्गावरील सर्व लोकल सांताक्रुझ ते मुंबई सेंट्रल, चर्चगेट दरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. तर, पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन ब्लॉक घेतला जाणार नाही.
हेही वाचा - Ganeshotsav 2021 : 'या' वेळेला होणार पुण्यातील मानाच्या गणपतींचे विसर्जन