मुंबई - मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगला या शासकीय निवासस्थानी समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. तसेच समन्वय समितीचे सदस्य व उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आदि उपस्थित होते.
5 आणि 6 जुलै रोजी होणाऱ्या पावसाळी अधिवेशना दरम्यान विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीबाबत या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाली. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार देण्याचे निश्चित झाले आहे. या आधीच पावसाळी अधिवेशनाला सर्व आमदारांनी उपस्थित राहावे, यासाठी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाने आपल्या आमदारांना व्हीप जारी केले आहे. यासोबतच पावसाळी अधिवेशनाच्या इतर मुद्यांवर देखील यावेळी चर्चा झाली. अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या विधेयकांबाबत या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती आहे.
चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत चर्चा -
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलेले आहे. या पत्रातून सचिन वाझे यानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर लावलेल्या आरोपाबाबत सीबीआय चौकशी करावी, असे पत्र लिहिले आहे. या मुद्द्यावर देखील या बैठकीत चर्चा झाली असल्याचे सूत्रांकडून माहिती आहे. सचिन वाझे याच्या कथित पत्रातून अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर लावलेल्या आरोपावरून अधिवेशनादरम्यान राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे या मुद्द्यावर देखील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.