मुंबई - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोना रुग्णवाढ बघता मुंबई महापालिकेने नवीन नियमावली जारी केली आहे. यानुसार गृह विलगीकरणासह लग्न समारंभ आणि सार्वजनिक आयोजनांचे नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
कोविड-19 चा धोका अजून टळलेला नाही. कोरोनाच्या नव्या स्वरुपातील विषाणूने जगातील काही देशांमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आपण मुंबईकरांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि नियमांचे पालन करावे, अशी विनंती महापौरांनी मुंबईकर जनतेला केली आहे. आज मुंबईच्या महापौरांनी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये विनामास्क फिरणाऱ्या लोकांना मास्क वाटप केले आणि मास्क न वापरणाऱ्या लोकांना सक्त ताकीदसुद्धा दिली. मुंबईकर जनता नियम पाळत नसेल तर परिस्थिती अवघड होईल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
कोरोना काय, असा हवेतून गायब होईल?
कोरोनाचा उतरणीला लागलेला आलेख परत वर चढत आहे आणि सगळ्यांनाच कोरोनाची आठवण झाली, नाहीतर सगळे कोरोना संपला, या अविर्भावात वागत होते. आज राज्यातील मोठ्या प्रमाणात नागरिक मास्क न लावता आपले दैनंदिन व्यवहार करत आहेत. सामाजिक अंतराचे तर कुणाला भान उरलेले नाही. सॅनिटायझरच्या रिकाम्या झालेल्या बाटल्या भरायची कुणाला आठवण राहिलेली नाही. या सर्व प्रतिबंधात्मक आणि सुरक्षिततेच्या उपायांना धाब्यावर बसवल्यावर कोरोना काय, असा हवेतून गायब होईल, अशी अपेक्षा ठेवणे शास्त्रीय दृष्टिकोनातून मोठी चूक आहे. कोरोना वाढीच्या या सर्व प्रकाराला नागरिकच जबाबदार आहेत. त्यामुळे व्यवस्थेच्या नावाने शिमगा करण्यापेक्षा आपण कशा पद्धतीने याकडे थोडे लक्ष दिले पाहिजे याचा विचार करण्याची हीच ती वेळ आहे, असे त्या म्हणाल्या.