मुंबई - मुंबईत असलेल्या मणिभवन मध्ये गांधीजींचे जवळपास सतरा वर्षे वास्तव्य होते. ही वास्तू अनेक ऐतिहासिक घडामोडींचे साक्षीदार राहिली. बापूंनी महत्वाचे सत्याग्रह, चळवळीचा पाया मणिभवनमधून रचला आहे.
मुंबईतील ग्रँड रोड येथे गावदेवी परिसरात असलेल्या लॅबर्नम रोड येथे ही ऐतिहासिक वास्तू आहे. महात्मा गांधी मणिभवन येथे बराच काळ वास्तव्याला होते. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीतल्या अनेक महत्त्वाच्या बैठका, सत्याग्रह, चळवळीची उगमस्थाने ही मणिभवन येथे राहिली आहेत. रोलेट कायद्याविरुद्धचा सत्याग्रह, हिंदू मुस्लिम एकता आणि स्वदेशी वस्तूंचा वापर या सर्व चळवळींचा उगम मणि भवनातून झाला.
गांधींंच्या वापरलेल्या वस्तूंचे संग्रहालय -
मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंपैकी मणिभवन ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. संपूर्ण मणिभवन परिसरामध्ये महात्मा गांधी यांचे विचार, त्यांनी दिलेले संदेश हे वाचायला किंवा पाहायला मिळतात. मणी भवनमध्ये संस्थेचे कार्यालय असून ग्रंथ संग्रहालय देखील आहे. या ग्रंथसंग्रहालयात जवळपास 50 हजार एवढ्या मोठ्या संख्येने पुस्तके उपलब्ध आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या बैठका, चळवळी, सत्याग्रहाची साक्ष आपल्याला मणिभवनमध्ये मिळते.
मणि भवनच्या पहिल्या मजल्यावर महात्मा गांधी यांच्या बालपणाविषयीच्या आठवणी जपून ठेवण्यात आल्या आहेत. तर दुसर्या मजल्यावर महात्मा गांधी राहत असलेल्या खोलीचे जतन केले गेले आहे. या खोलीत महात्मा गांधी यांची लेखन सामग्री, सुत कातण्याचा चारखा, लिखाणासाठी वापरत असलेला टेबल तसेच इतर साहित्य यांची जपणूक केली गेली आहे.
तसेच महात्मा गांधीं बाबतच्या महत्त्वाच्या घटनांचा सारांश या खोलीमध्ये पाहायला मिळतो. देशभरातील सर्वच महत्वाचे नेते बापूंना मणिभवनमध्ये येथून भेटत असत.
कोरोनामुळे दोन वर्ष मणीभवन बंद -
गेल्या दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भावामुळे पर्यटकांसाठी मणि भवन बंद ठेवण्यात आले आहे. तसेच अद्यापही काही दुरूस्तीचे काम सुरू असल्याने पुढील दोन महिने अजूनही मणिभवन बंद राहील. मात्र मार्च महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा देशी आणि परदेशी पर्यटकांसाठी मणिभवन खुले केले जाईल, अशी माहिती मणि भवन गांधी संग्रहालयाचे सेक्रेटरी मेघश्याम आजगावकर यांनी दिली. तसेच वर्षभरात मणिभवन येथे विविध उपक्रम केले जातात. खास करून महात्मा गांधी यांच्या दोन ऑक्टोबरला होणाऱ्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम या वास्तूमध्ये केले जातात. मोठ्या उत्साहात महात्मा गांधींची जयंती येथे साजरी केली जाते.
ग्रामोद्योगात तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री देखील मणिभवन येथे केली जाते. जुलै ते ऑक्टोबर महिन्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम या मणिभवनामध्ये केले जातात. वकृत्व स्पर्धा, कवी वाचन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी भरवल्या जातात. तसेच विद्यार्थ्यांसाठी चरखा प्रशिक्षण देखील मणि भवनात दिले जाते. तसेच इतर सामाजिक उपक्रम देखील वेळोवेळी राबवले जात आहेत.
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेला गांधी विचार आणि ग्रामीण विकास या विषयांवर पीएचडी अभ्यासक्रम घेतला जातो. असे अनेक उपक्रम अजूनही मणि भवन मध्ये सुरू आहेत. एकूणच महात्मा गांधी यांचा विचार अजूनही सर्वसामान्य जनतेपर्यंत, तरुणांपर्यंत पोहोचावा यासाठी मनी भवनातून प्रयत्न केले जात असल्याचे देखील मेघश्याम आजगावकर यांनी सांगितले.