मुंबई - रेल्वेने प्रवास करणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. फलाटवर लोकल पकडण्यासाठी थांबल्यानंतर चालत्या लोकलच्या दारात उभ्या असलेल्या एका व्यक्तीने तिच्यावर हल्ला केला. यामध्ये संबंधित तरुणीच्या चेहऱ्यावर जखम झाली आहे.
28 जानेवारीला मुलुंड येथील रहिवासी अंकिता धुरी ही विक्रोळीला कामावर जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर उभी होती. फलाटावर उभी असताना चालत्या लोकलमधून लटकलेल्या एकाने तिच्या चेहऱ्यावर जोरदार प्रहार केला. यामध्ये अंकिता जबर जखमी झाली आहे. यानंतर तिला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या गंभीर प्रकारानंतर लोहमार्ग पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही. तसेच संबंधित आरोपीवर कारवाई संबंधी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे तरुणीने सांगितले आहे. या घटनेमुळे मुंबईतील तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.