मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी काल (सोमवार) राज्यात मतदान प्रक्रिया पार पाडली. २०१४ च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी जवळपास ४ टक्क्यांनी घसरल्याचे दिसून आले. मतदानाची टक्केवारी समोर आल्यानंतर लगेचच विविध माध्यमांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे कल जाहीर झाले. यात भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील असे सांगण्यात आले असून काही माध्यमांनी भाजप एकहाती बहुमताचा आकडा पार करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
२०१४ च्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक १२३ जागा मिळाल्या होत्या. शिवसेना ६३, काँग्रेस ४२, राष्ट्रवादी काँग्रेस ४१, मनसे १ आणि इतर पक्षांना १८ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी राज्यात ६४ टक्के मतदान झाले होते. २०१४ च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले. निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेनेने एकमेंकावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. मात्र, मोदी लाटेचा परिणाम एवढा मोठा झाला की, ज्या भाजपला २००९ च्या विधानसभेला ४६ जागा मिळाल्या होत्या, त्यामध्ये दुपटीहून अधिक वाढ होऊन १२३ जागा मिळाल्या मात्र, स्पष्ट बहुमताचा कौल राज्याने दिला नाही. त्यामुळे ज्या शिवसेनेवर टीका करत त्यांना संपवण्याची भाषा करणाऱ्या भाजपने त्यांनाच सोबत घेऊन देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली पाच वर्षे सरकार चालवले. निकालानंतर शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचे वक्तव्य करून शिवसेनेची कोंडी केली होती. त्यामुळे शिवसेनेची आक्रमकता आपोआपच कमी झाली होती.
यावेळी २०१४ ची चूक लक्षात घेऊन सेना-भाजपने युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करण्याचा निर्णय घेतला. निवडणूक प्रचारामध्ये भाजप-शिवसेना आघाडीवर होती. मात्र, शेवटच्या दोन-तीन आठवड्यात शरद पवारांनी चिकाटीने प्रचार करत भाजप-सनेला आव्हान दिले. मतदानोत्तर चाचण्यांमधून युतीला बहुमत मिळणार असल्याचे सांगितले जात असले तरी शरद पवारांच्या प्रचारामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी किती जागा जिंकते, यासाठी निकालावर सर्वांच्या नजरा आहेत.
मतदानाची टक्केवारी
भाजपला २०१४ च्या निवडणुकीमध्ये २७.०८ टक्के मते मिळाली होती. तर शिवसेनेला १९.०३ टक्के, काँग्रेसला १८ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेस १७.०२ टक्के आणि इतप पक्ष आणि अपक्षांना मिळून १७.०७ टक्के मतदान मिळाले होते.
पक्षीय बलाबल
पक्षीय बलाबलाचा विचार करता २००९ मध्ये ४६ जागा मिळालेल्या भाजपला २०१४ मध्ये १२३ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेच्या जागा ४४ वरून ६३ पर्यंत गेल्या. तर काँग्रसची ८२ जागांवरून ४२ जागांवर घसरण झाली, राष्ट्रवादीही ६२ जागांवरून ४१ जागांवर आली. तर मनसेची १३ अवघ्या एका जागेपर्यंत धक्कादायक घसरण झाली होती. त्यामुळे यावेळी या सर्वच प्रमुख पक्षांमधील कोणाला किती जागा मिळणार आणि कोण तळाला जाणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.
कसा असेल मतांचा कल?
मतदानानंतर विविध मतदानोत्तर चाचण्यांचे कल जाहीर झाले. या चाचण्यांवरून भाजप सध्या मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे. भाजपला या वेळी स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला होता. शिवाय, राज ठाकरेंची विरोधी पक्षनेता होण्याच्या मागणीचीही चर्चा झाली होती. यासोबतच, स्थानिक पातळीवरील उमेदवारांकडे पाहण्याच्या मतदारांच्या दृष्टिकोनातूनही निवडणुकीचे भवितव्य निश्चित होणार आहे.
निकाल स्पष्ट झाल्यानंतर भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल का? ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एकाकी खिंड लढवताना निकराने केलेल्या प्रयत्नांचे चीज होईल का? पुन्हा सत्तास्थापनेची संधी मिळाल्यास भाजपसह सध्या युतीत असलेल्या शिवसेनेला कोणते स्थान मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.