मुंबई : राज्यात जनावरांना लंपी या विषाणूची लागण झाली आहे. हा प्रसार आता मुंबईपर्यंत पोहचला असल्याची माहिती मिळत आहे. लंपीची लागण झाल्याची संशयीत गायचा नमुना पुण्याच्या रोग अन्वेषण विभागाकडे पाठवण्यात आला आहे. या आहवालानंतर सदर गायीला लंपी विषाणूची लागण झाली आहे का हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान मुंबईमध्ये गायींचे लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शैलेश पेठे यांनी दिली.
मुंबई महापालिका सतर्क : राज्यातील जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात ऑगस्ट मध्ये जनावरांना लंपीची लागण झाल्याचे निदान झाले. त्यानंतर आतापर्यंत लंपी विषाणुचा झपाट्याने प्रसार होत असून जनावरे दगावण्याची संख्या वाढत आहे. गोजातीय प्रजातींची बाधित असलेली कोणतीही जीवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गोजातीय प्रजातींची कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवा-यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी, नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. जनावरांना लंपी विषाणूची लागण होत असल्याने मुंबई महापालिकेने आपल्या हद्दीतील ३२२६ गोजातीय, तर २४,३८८ म्हैसवर्गीय यांची तपासणी सुरू केली आहे. तबेले आणि गोठे तपासले जात आहेत. तसेच ३२२६ गोजातीय जनावरांचे लसीकरण केले जात आहे. त्यापैकी १९०८ गाईंच लसीकरण करण्यात आल्याचे डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले.
एका गायीला लंपीच्या लागणची शक्यता : राज्यात अनेक जिल्ह्यांत लंपी विषाणुचा फैलाव झपाट्याने होत असताना मुंबईत एका गायीला लंपी विषाणूची लागण झाल्याचा संशय आहे. या गायीचा नमुना पुण्याच्या रोग अन्वेषण विभागाकडे पाठवला असून त्याच्या अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. आहवाल आल्यानंतर या गायीला लंपी विषाणूची लागण झाली आहे का नाही ते स्पष्ट होणार असल्याचे डॉ. पेठे यांनी सांगितले.
असा होतो रोगाचा प्रसार : लंपी स्कीन डिसिज विषाणूजन्य चर्मरोग साथीचा आजार आहे. रोगाचे जंतू देवी विषाणू गटातील कॅप्रीपॉक्स वर्ग मधील असून गायींमध्ये आढळतो. या विषाणूची लागण शेळ्या मेढ्यांना होत नाही. आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणा-या माश्या, डास, गोचीड, चिलटे यांच्यामार्फत होतो. तसेच या आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होऊ शकतो. लंपी विषाणुची लागण गोवंशीयांना होते. मात्र मनुष्याला लंपी विषाणुचा धोका नसून दूधापासून रोग पसरण्याची भीती नाही, असेही पेठे यांनी स्पष्ट केले.
अशी आहेत लक्षणे :
- लंपी आजार गोवंशीय प्राण्यांमध्ये होणारा संसर्गजन्य आजार आहे. याला कॅपरीपॉक्सही म्हटले जाते. या आजारात डास, माशा, गोचीड आदींच्या माध्यमातून आजाराचा प्रसार होतो.
- दूषित अन्न-पाण्याच्या सेवनानेही आजाराचा प्रसार होतो. या विषाणूची लागण झालेल्या जनावरांच्या त्वचेवर गुठळ्या तयार होऊन फोड येतात.
- यानंतर गुरांना ताप येणे, नाक वाहणे, जास्त लाळ गळणे, डोळे येणे अशी लक्षणे दिसतात. सध्या या आजारावर कोणताही उपचार नसून प्रतिबंधासाठी ‘गोटपॉक्स’ लस वापरली जात आहे.