मुंबई - महाराष्ट्रात 'ब्रेक द चेन'च्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. आता नव्या नियमावलीनुसार लोकल, मेट्रो, मोनो प्रवासात फक्त सरकारी, वैद्यकीय कर्मचारी आणि गंभीर रुग्णांना उपचार घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. आज रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहे. नियम मोडणाऱ्या प्रवाशांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे.
रेल्वे, मेट्रो, मोनो अशी सुरू राहणार -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात 1 में पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहे. शासनाच्या सूचनेनुसार सार्वजनिक वाहतूक व्यवस्थामध्ये फक्त आता शासकीय कर्मचारी आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे रेल्वे, मेट्रो, मोनो प्रशासनाने खबरदारीची पावले उचलली आहेत. स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. यासह स्थानकावर रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. तसेच खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त ५० टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. नियमांचं उल्लंघन झाल्यास १० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
लांब पल्ल्यांच्या गाड्या प्रवाशांसाठी थर्मल चेकिंग -
रेल्वे शासनाने दिलेल्या माहितीनुसार, लांब पल्ल्यांच्या गाड्या जिथे थांबतात, त्यांची थर्मल चेकिंग केली जात आहे. यासह कोरोना चाचणी केली जात आहे. लोकल प्रवासात कोणत्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे, याची यादी अद्याप आली नाही. नवीन यादी जाहीर झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कॅटेगिरीप्रमाणे लोकल प्रवासात परवानगी देण्यात येईल. यासह आता रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वार बंदी करण्यासाठी सुरूवात केली आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
रात्री 8 वाजतापासून नवीन नियम लागू -
राज्य सरकारने दिलेल्या सुचनांचे पालन केले जाणार आहे. लोकल फेऱ्यांबाबतचे नियोजन केले जाणार आहे. काही स्थानकांचे प्रवेशद्वार बंद केले आहेत. अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार त्यांचे पालन करण्यात येईल, असे मेट्रो आणि मोनो प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - Maharashtralockdown : राज्यात आजपासून कडक निर्बंध लागू; नवीन नियमावली जाहीर