मुंबई - आरेत आता बिबट्या कधी कोणावर हल्ला करेल याचा नेम नाही. गोरेगाव (पूर्व ) आरे मध्ये युनिट नंबर ३ च्या सरकारी निवासस्थान येथे रहात असलेल्या कुमार आयुष यादव या ४ वर्ष वयाच्या बालकावर बिबट्याने २६ तारखेला रात्री साडेआठ वाजता हल्ला केला होता. सदर घटना ताजी असतांना काल रात्री आरे मध्यवर्ती कार्यालय विसावा येथे सुमारे आठच्या सुमारास बिबट्याने पाठीमागून येत महिलेवर जोरदार हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
बिबट्याचा हल्ला परतवून लावला -
महिला घरातून बाहेर काठी टेकत आली आणि येथील कठड्यावर बसली. मग लगेच चक्क मागून येत बिबट्याने तीच्यावर हल्ला केला. बिबट्या या महिलेवर हल्ला करत असतांना या शूर महिलेने आपला जीव वाचवण्यासाठी आपल्या हातातील काठीने बिबट्यावर प्रति हल्ला करत त्याचा हल्ला परतवून लावला. त्यानंतर आजू बाजूला राहणारे नागरिक येथे आले. तेव्हा या महिलेने बिबट्याने हल्ला कसा केला आणि आपण कशी सुटका केली. देव बलवत्तर म्हणून आज या महिलेचा जीव वाचला. या भागात वनखात्याने रात्रीची गस्त वाढवावी, प्रखर दिवे लावावे आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावावे अशी मागणी निलेश धुरी यांनी केली.
वनखातं गंभीर होणार काय...
आरे वसाहतीत गेले अनेक महिने बिबट्या येत आहे. आता बिबट्याने आपला मोर्चा आरेत वळवला असून तो चक्क येथील नागरिकांवर हल्ला करू लागल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनखात्याने गांभीर्याने दखल घेऊन बिबट्याचा लवकर बंदोबस्त करण्यासाठी त्याला जेरबंद करून पिंजरे लावावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नागरिकांवरील हल्ले वाढल्याने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना वनखाते कधी करणार असा सवाल आरेवासीयांनी केला आहे.