मुंबई - मुख्यमंत्रीपदावर नसतानाही महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अद्यापही तोच सन्मान देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी, जनतेने त्यांच्यावरील प्रेम व सन्मान दाखवून दिला आहे. आजही महाराष्ट्राचे लोकाभिमुख नेते म्हणून देवेंद्र यांना मान्यता आहे. त्याचाच त्रास महाविकास आघाडी सरकारला व सत्ताधारी नेत्यांना खऱ्या अर्थाने होतोय व तोच खरा पोटशूळ महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये दिसतोय, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात पिंपरी येथे पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील भाजप सरकार तसेच भाजप नेते यांच्यावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना दरेकर म्हणाले की, तेच तेच विषय सारखे उगाळले जात आहेत. जीएसटीच्या बाबतीत असेल, केंद्रीय तपास यंत्रणांच्या बाबतीत असेल, देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळा आपली भूमिका याविषयांवर स्पष्ट केली होती. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर, महाराष्ट्राच्या विकासावर किंवा सरकारच्या कामगिरीवर हे सरकार भाष्य करत नाही पण केवळ केंद्र, राज्य वाद निर्माण केला जात आहे, असेही दरेकर म्हणाले.
हे ही वाचा - ..अन् उद्धव ठाकरे बनले मुख्यमंत्री, शरद पवारांनी सांगितला 'तो' किस्सा.. केंद्र सरकारवर हल्लाबोल
आयकर विभागाच्या धाडी व तपासाचा राज्यातील जनतेशी संबंध नाही -
केंद्र सरकारशी समन्वय साधत विकासनिधी आणि कामे होऊ शकतात. ज्या विषयावर वक्तव्य करायला पाहिजे ते होत नाही. आयकर धाडीतील बेहिशोबी मालमत्ते संदर्भात कुठल्याही प्रकारचे भाष्य करत नाहीत. आयकर विभागाच्या धाडी, तपास यंत्रणांचा जो काही तपास सुरु आहे, याच्याशी सर्वसामान्य माणसाला काहीही देणेघेणे नाही. कारण सध्याच्या आयकर विभागाच्या धाडी व तपास हे राजकीय नेत्यांच्या वा त्यांच्या कुटुंबाशी संबधित विषय आहेत. त्यामुळे हे संपूर्ण महाराष्ट्राचे दुखणे आहे, असे म्हणण्याला येथे वाव नाही. तेच तेच विषय पुन्हा पुन्हा उगळण्यात येत आहेत. महाराष्ट्राच्या विकासावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, जेथे अडचणी आहेत, त्यावर भविष्यातील उपाययोजना यावर भाष्य न करता केवळ राजकीय अभिनिवेशातून द्वेषाचे राजकारण दिवसेंदिवस कसे वाढेल आणि आपली सत्ता कशी अबाधित राहील असाच प्रयत्न अशा प्रकारच्या वकतव्यांमधून दिसून येत असल्याचे दरेकर म्हणाले.