मुंबई - समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह ( Mulayam Singh Yadav ) यांच्या निधनावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ( Deputy Chief Minister Devendra Fadwanis ) यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचबरोबर सध्या उद्धव ठाकरे गट- शिंदे गट यांच्यात सुरू असलेल्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावरील शीतयुद्धावर त्यांनी टीका केली आहे. वेळ काढून कायदा टाळता येत नाही. त्याला सामोरे जावंच लागतं,अशी टीका देवेंद्र फडवणीस यांनी उद्धव ठाकरे ( Devendra Fadvanis criticizes Uddhav Thackeray ) यांच्यावर केली आहे. मुंबईत एका कार्यक्रमात ते बोलत होते.
मुलायम सिंह देशाचे मोठे राजनीतितज्ञ - समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांच आज निधन ( Mulayam Singh Yadav passed away today ) झालं. त्यांच्या निधनावर श्रद्धांजली वाहताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुलायम सिंह यादव हे देशाचे मोठे राजनीतिकार होते. उत्तर प्रदेश व देशाच्या विकासामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. देशाच्या राजकारणात सुद्धा त्यांनी भूमिका निभावली असून जुन्या समाजवादी नेत्यांमध्ये एक मोठं नाव त्यांचं होतं. त्यांच्या जाण्याने मोठे दुःख झालं असून मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो व त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची देव शक्ती देवो, अशी प्रार्थना करतो.
रिफायनरी प्रकल्पाला विरोध नको? - केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये आज राऊंड टेबल गुंतवणूकदारांची परिषद पार पडली. या परिषदे संबंधि बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी केंद्र सरकारचे तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचेही मी आभारी मानतो. कारण, महाराष्ट्रात, मुंबईत गुंतवणुकीसाठी त्यांनी राऊंड टेबल परिषद ही मुंबईत आयोजित केली. यामध्ये औरंगाबाद, छत्रपती संभाजी नगरला गुंतवणुकीसाठी ओरिक इंडस्ट्री तयार करण्यात आली असून देश विदेशातील गुंतवणूकदार आज येथे उपस्थित झाले आहेत. या परिषदेनंतर मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणुक महाराष्ट्र, मुंबईमध्ये येईल. केवल अपेक्षा एवढीच आहे की यामध्ये राजकारण आणता कामा नये. त्याचबरोबर रिफायनरी प्रोजेक्टला होणारा विरोध हा बंद करायला हवा, असेही त्यांनी आवर्जून सांगितलं. मराठवाड्यात गुंतवणुकीसाठी फार मोठी संधी असून केंद्र सरकारचे मोठे योगदान यामध्ये लागणार आहे. त्याचबरोबर या कारणास्तव नागपूर- मुंबई एक्सप्रेस वे रेल कनेक्टिव्हिटी सुद्धा याचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
निर्णय विरोधात गेला तर ओरड करायची? - निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांचं चिन्ह धनुष्यबाण तसेच शिवसेना या नावावर पाबंदी घातल्या कारणाने राजकारण तापू लागले आहे. उद्धव ठाकरे गट त्याचबरोबर महाविकास आघाडीतील नेते याबाबत भाजपवर षडयंत्राचा आरोप करत आहेत. याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाने जेवढा वेळ मागितला तेवढा वेळ त्यांनी आवर्जून दिलेला आहे. वेळ काढून कायदा टाळता येत नाही. कायद्याला कधी ना कधी तरी सामोरे जावं लागतं. जेव्हा निर्णय त्यांच्या बाजूने लागत नाही तेव्हा अशा पद्धतीचे आरोप केले जातात. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे आता निवडणूक आयोग त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सुद्धा आक्षेप घेत आहे हे चुकीचं असल्याचंही देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले आहे. तसेच बनावट प्रतिज्ञापत्र सादर केल्या प्रकरणी उद्धव ठाकरे गटावर आरोप होत आहेत. याविषयी बोलताना ते म्हणाले की, कुठेही जर बोगस शिक्के मारले असतील किंवा चुकीची प्रमाणपत्र बनवली असतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई नक्की केली जाईल.