मुंबई: भाजप नेते आशिष शेलार (ashish shelar) यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत अनेक ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले. या बॅनरवर मिशन 150 असे लिहिण्यात आले आहे. यावर, नुसते बॅनर लावून महापालिकेत 150 जागा मिळत नाहीत, त्यासाठी जनतेशी नाळ असावी लागते असा टोला मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी शेलारांना लगावला आहे. (kishori pednekar attack on ashish shelar).
आम्ही गर्दीवर अवलंबून नाही: 150 मिशन असे बॅनर लावले म्हणजे 150 जागा झोळीत आल्या असे होत नाही, त्यासाठी जनतेशी नाळ जोडलेली असायला हवी असा टोला पेडणेकर यांनी लगावला आहे. आम्ही गर्दीवर अवलंबून नाही, निष्ठावंत मेळाव्याला येतीलच असा दावा त्यांनी केला. आम्ही नेहमी गर्दीचा विक्रम मोडत आलो आहोत. शिंदे गटाच्या आमदारांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या का असतात असा प्रश्न उपस्थित करत कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या सभेला जाणार अशी टीका पेडणेकर यांनी केली आहे. काहींच्या लाखोंच्या संख्येने सभा होतात मात्र त्यांचे उमेदवार जिंकत नाहीत, असेही त्या म्हणाल्या.
उद्धव ठाकरे यांना पाठींबा: उद्धव ठाकरे यांचे कोविड मधील काम सर्वांसमोर आहे. रश्मी ठाकरे ह्या राजकारणी नाहीत, त्या महिलांमध्ये रमतात. त्या दरवर्षी ठाण्यात देवीला जातात. बदललेल्या परिस्थितीत त्या ठाण्याला गेल्या. म्हणून नवीन वाटतं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पोस्टरद्वारे उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला पाठिंबा दिला आहे. सगळ्यांना कळत आहे बाळासाहेब यांचा खरा वारसा कोण चालवत आहे, त्यामुळे प्रत्येकजण उद्धव ठाकरे यांना पाठींबा देत आहे असेही पेडणेकर यांनी बोलताना सांगितले. मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात जाणार अशी चर्चा आहे, यावर बोलताना, नार्वेकर यांची चिंता नको, त्यांचे ठाकरे कुटुंबावर प्रेम आणि निष्ठा आहे. गुवाहाटी, गोवा, सुरतचा खर्च शिंदे गटाला परवडणारा नाही, त्यामुळे कोण कोणाबरोबर आहे हे लहान मुलगाही सांगेल असे पेडणेकर म्हणाल्या.
तुम्ही चोच का मारता?: रामदास कदम यांना उद्देशून, तुम्हाला कोण विचारते? तुमचं चरित्र काय? उगाच चोच का मारता? तुम्ही भर विधानसभेत कबुली दिली की बाळासाहेब आणि उद्धव यांनी खूप काही दिले. तुम्हाला कोणी विचारलं नाही तुम्ही समाधानी आहात की नाही असा इशारा पेडणेकर यांनी दिला. सण सुरू आहेत, संघर्षाच वातावरण राज्यात आहे त्यामुळे पालिका दुकानावरील मराठी पाट्यांवर लगेच कारवाई करत नाही आहे असे पेडणेकर म्हणाल्या.