मुंबई - कर्नाटकमधील सत्ताधारी आमदारांनी एकत्र दिलेल्या राजीनाम्यामुळे सुरू झालेल्या राजकीय नाट्याचा खरा प्रयोग हा मुंबईतच सुरु आहे. कर्नाटकच्या बंडखोर आमदारांनी मुंबईतच ठाण मांडल्याने त्यांची सुरक्षा मुंबई पोलिसांना करावी लागत आहे. त्यामुळे या राजकीय नाट्यातील पात्रांचा खरा भार हा मुंबई पोलिसांवरच असल्याचे दिसत आहे.
आमदारांच्या सूरक्षेचा शहर पोलिसांवर अतिरिक्त भार
मुंबईत असणारे बंडखोर आमदार फुटू नयेत, यासाठी हॉटेलबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याबरोबरच हे आमदार राहत असलेल्या हॉटेलमधील रूम देखील बदलण्यात आली आहे. बंडखोर आमदारांनी काँग्रेस नेत्यांकडून आपल्या जीवाला धोका आहे, असे पत्र मुंबई पोलिसांना लिहले आहे. यामुळे मुंबई पोलिसांना अधिक सतर्क रहावे लागत आहे.
कर्नाटकचा तिढा सूटण्याची शक्यता
कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत. 18 जुलैला कुमारस्वामी सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे या राजकीय नाट्याचा आता लवकरच शेवट होईल अशी चिन्हे आहेत.
काँग्रेसकडून बंडखोर आमदारांची मनधरणी
भाजपची खेळी उलटवण्यासाठी जनता दल (एस) आणि काँग्रेसने शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. राजीनामा दिलेल्या बंडखोर आमदारांची मन बदलण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू झाल्या आहेत. यात बंडखोरांपैकी दोन आमदारांची समजूत काढण्यास काँग्रेसला यश मिळाले आहे. मात्र, काही आमदार आपल्या अजूनही आम्ही राजीनामा पाठीमागे घेणार नाही, यावर ठाम आहेत. असे चित्र दिसत आहे.