नवी मुंबई - कोरोनामुळे लॉकडाउन काळात कित्येक लोकांचे रोजगार गेले आहेत. यातील प्रत्येकाला नोगरीची गरज आहे, अशी त्यांची परिस्थिती आहे. मात्र, याचा काही ठिकाणी गैरफायदा घेतला जात आहे. नवी मुंबईतील एका शिपिंग कंपनीच्या नावे ऑनलाइन पैसे मागवून चक्क एक दोन नव्हे, तर 100 पेक्षा अधिक तरुणांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी या शिपिंग कंपनीच्या विरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
'सिमेन शिपिंग सर्विस कंपनीच्या नावे तक्रार'
सिमेन शिपिंग सर्विस या कंपनीच्या नावे नोकरी मिळावी म्हणून गुजरात, केरळ, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तसेच मुंबई, सातारा, सांगली, रत्नागिरी व महाराष्ट्रातील इतर भागातील 100 पेक्षा अधिक तरुणांनी या कंपनीच्या खात्यावर प्रत्येकी सुमारे लाखो रुपयांची रक्कम ट्रान्स्फर केली होती. त्यानंतर कंपनीच्या माध्यमातून या तरुणांना खोटा व्हिजा देखील देण्यात आला. मात्र, तो व्हिजा खोटा असल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणांनी कंपनीशी वारंवार संपर्क साधला. मात्र, त्यांचा फोन बंद आला. त्यानंतर या तरुणांनी कंपनीच्या नेरुळ येथील नवी मुंबईतील कार्यालयात धाव घेतली. दरम्यान, हे कंपनीचे ऑफिस नसल्याचे समोर आले.
'एकाच व्यक्तीने विविध कंपन्या स्थापन करून केली फसवणूक'
सिमेंस शिपिंग कंपनीच्या नावे सुनील चौहान, पूजा, शैलेश, युसूफ यांनी नोकरीची गरज असलेल्या तरुणांना एप्रिल महिन्यात मेलच्या माध्यमातून संपर्क केला. मेलवर संपर्क झाल्यावर त्यांना नवी मुंबई येथील ऑफिसमध्ये बोलावले. हेलिना शिपिंग मॅनेजमेंट, आरपीएसएल, अजदीन मॅनेजमेंट प्रा.लिमिटेड अशा विविध प्रकारच्या देश विदेशातील शिपिंग कंपन्यांशी करार असून, तिथे जॉब लावण्यासाठी 1 लाख ते 4 लाख इतकी रक्कम घेतली. त्यातून त्यांना खोटा व्हीजा व खोटे विमान तिकीट दिले. त्यानंतर पैसे घेऊन सगळ्यांनी ऑफिस बंद करून पोबारा केला. या प्रकरणी तरुणांनी दिलेल्या माहितीवरुन नेरुळ पोलीस ठाण्यात संबंधीत कंपनीवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच, बेलापूर पोलीस ठाण्यातही याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.