मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तिन्ही कृषी कायदे (Farm Laws) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. राजधानी दिल्लीच्या सीमारेषेवर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) यश आलं. शेतकऱ्यांच्या विजयाचं देशभरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. झालेली चूक सुधारत केंद्र सरकारने शेतकरीविरोधी असलेले कायदे मागे घेत असल्याची घोषणा आज सकाळी केली. लोकशाहीच्या समोर आज अखेर हुकूमशाही झुकली, अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.
यावर अधिक मत व्यक्त करताना जयंत पाटील म्हणाले आहेत की, देशातील शेतकऱ्यांचा विरोध असताना तीन काळे कायदे करून या देशातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा गुलामगिरीत ढकलण्याचा भाजपा सरकारचा डाव होता. देशातील शेतकऱ्यांनी या विरोधात प्राणपणाने लढा दिला आणि त्यामुळेच आज अखेर देशातील या हुकूमशाही सरकारला शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले. शेतकऱ्यांच्या या लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापासून शेतकऱ्यांच्या बाजूने लढत होता असे त्यांनी नमूद केले. जवळपास 630 शेतकऱ्यांनी बलिदान दिल्यानंतर सरकारने हे कायदे परत घेतले आहेत. येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जरी हा निर्णय घेतला असला तरी या काळ्या कायद्यांमधील तरतुदी वेगवेगळ्या मार्गांनी अंमलात आणण्याचा प्रयत्न पुन्हा केंद्र सरकारने करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.