मुंबई- शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीकडून सीबीआय कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. कारागृहात इतर कैद्यांप्रमाणे साडी न नेसण्यासाठी सूट मिळावी म्हणून इंद्राणी मुखर्जीने याचीका दाखल केली होती. कारागृहातील ज्या महिला कैद्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे, त्यांचा पोशाख हिरव्या साडीचा आहे. मात्र माझ्यावर अद्यापही खटला चालू असून, कारागृहातील हिरव्या साडीचा पोशाख न घालण्यासाठी मला सूट मिळावी असा युक्तीवाद मुखर्जीने केला होता. मात्र न्यायाधीश जेसी जगदाळे यांनी तीची याचिका फेटाळून लावली आहे.
इंद्राणी मुखर्जी मानसिक तणावाखाली
इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांकडून न्यायालयामध्ये युक्तिवाद करण्यात आला होता की, इंद्राणी मुखर्जीला अटक झाल्यापासून ती मानसिक तणावाखाली असून, अशा प्रकारचा कारागृहातील पोशाख तीला घालण्यास दिल्यास तिच्या आजारपणात आणखीन वाढ होईल. इंद्राणी मुखर्जीला 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. मात्र 5 वर्षानंतर कुठल्या कारणास्तव तिला कारागृहातील पोशाख घालण्यासाठी बळजबरी केली जात आहे? असा सवालही इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांकडून न्यायालयात विचारण्यात आला होता.
2012 साली झाली होती शीना बोराची हत्या
इंद्राणी मुखर्जीने आपल्या पहिल्या पतीपासून जन्माला आलेल्या शीना बोराची 2012 साली हत्या केली होती. या संदर्भात इंद्राणी मुखर्जीचा वाहनचालक शामवर राय, दुसरा पती संजीव खन्ना यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. इंद्राणी मुखर्जीचा तिसरा पती पीटर मुखर्जीला मार्च 2020 मध्ये जामीन मंजूर करण्यात आला.