मुंबई - शिवसेनेचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित दसरा मेळावा उद्या पार पडणार आहे. विशेष म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच एकाच पक्षाचे दोन दसरा मेळावे होत आहेत. मुंबईत होणाऱ्या दोन्ही दसरा मेळाव्यांना अतिरिक्त सुरक्षा मुंबई पोलीस पुरवणार आहेत. आज मंगळवारी (4 ऑक्टोबर)रोजी दुपारी मुंबई पोलीस दलाच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस विश्वास नांगरे पाटील यांनी शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केली. तसेच शिवाजी पार्कवरील बीट चौकीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली. नांगरे पाटील यांनी बीकेसी मैदानावर जाऊन सुरक्षेचा आढावाही घेतला आहे. या पाहणीवेळी पोलिसांनी डोळ्यात तेल घालून काम करावे असे आदेश त्यांनी यावेळी दिले आहेत. दसऱ्या मेळाव्याच्या दिवशी मोबाईल वापरू नका कामावर शंभर टक्के लक्ष द्या असे आवाहन त्यांनी केले आहे. मोबाईलचा उद्याच्या दिवस वापर टाळावा असे विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे.
ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते उद्या मोठ्या संख्येने गर्दी जमण्याची शक्यता असून या गटांत ठिणगी पडू नये म्हणून मुंबई पोलीस सज्ज आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दसरा मेळाव्याच्या दृष्टीने केलेल्या बंदोबस्ताविषयी माहिती दिली आहे. नांगरे पाटील म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था टिकली पाहिजे यासाठी आम्ही विशेष काळजी घेत आहोत. दोन्ही मैदानात मोठा बंदोबस्त आम्ही लावलेला आहे. क्विक रिस्पॉन्स टीम, दंगल नियंत्रण पथक आणि इतर यंत्रणाही आम्ही लावलेली आहे असही ते म्हणाले आहेत.
महिला सुरक्षेसाठी पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांबद्दल बोलताना विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, "महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही विशेष काळजी घेत आहोत. महिला सुरक्षेच्या अनुषंगाने आम्ही महिलांसाठी वेगळे विभाग बनवले आहेत. काही ठिकाणी महिला आणि पुरुष असे एकत्रित सेक्टर बनवलेत पण त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही तयारी केलेली आहे. उद्या गर्दी होणारच आहे. मात्र, तुम्ही स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. पोलीस आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडतील, असे नागरिकांना नांगरे पाटील यांनी आवाहन केले आहे.