मुंबई - मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर, लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे लोकांनी ठरवावे त्याना लॉकडाऊन हवाय का नाही, असा इशारा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे.
तर रात्रीचे नियम दिवसा लावावे लागतील -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला कोरोनासंबंधीचे नियम पाळावेत असे आवाहन केलं. मात्र त्या आवाहनाला जनतेकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नाहीये. सध्या राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. खास करून महाराष्ट्रातल्या महानगरांमध्ये ही संख्या उच्चांक गाठताना दिसतेय. मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सरकार समोर आव्हान नक्कीच आहे. परिस्थिती अशीच राहिली तर, सध्या रात्रीचे जे नियम लावण्यात आलेले आहेत, तेच नियम दिवसाही लावल्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे लॉकडाऊन हवा किंवा नाही हे आता जनतेच्या हातात आहे. जनतेने नियम पाळले नाही, तर सरकारला लॉक डाऊन लावावा लागेल. असा इशाराच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे.
टास्क फोर्सकडून लॉकडाऊनबाबत नियोजन -
राज्य सरकारने लॉकडाउनच्या दिशेने पावले उचलायला सुरुवात केली असून खासगी रुग्णालयातील 80% बेड ताब्यात घ्यायची सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात येईल, असेही पत्रकारांशी बोलताना अस्लम शेख यांनी सांगितले. तसेच किराणा दुकान, मॉल्स, रेल्वे या ठिकाणी काय व्यवस्था असायला पाहिजे यासंबंधीचे नियोजन देखील राज्य सरकारने करायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊन केल्याने लोकांच्या व्यवसायावर परिणाम होतो. मात्र व्यवसाया पेक्षाही जीव महत्त्वाचा असल्याने योग्य तो निर्णय लवकरच शासनाकडून घेण्यात येईल. लॉकडाऊन संदर्भाचे नियोजन कसं असलं पाहिजे यावर टास्क फोर्स काम करत असल्याची माहिती असलम शेख यांनी दिली
आरोग्य व्यवस्था कमी पडल्यास लॉकडाऊन - आरोग्यमंत्री
सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र राज्य सरकारकडून आरोग्य व्यवस्था तयार आहे. पण ज्याप्रमाणे राज्याच्या ग्रामीण भागात तसेच महानगरांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत राहिली तर, येणाऱ्या काळात आरोग्य व्यवस्था तुटपुंजी पडू शकते. अद्याप तरी आरोग्यव्यवस्था तुटपुंजी असल्याच्या तक्रारी समोर आलेल्या नाहीत. पण याच प्रकारे रुग्णसंख्या वाढत राहिली तर, ऑक्सिजन आणि आयसीयूच्या बेड संदर्भातील तक्रारी वाढू शकतात. या तक्रारी वाढल्या तर, राज्यसरकार समोर लॉक डाऊन शिवाय पर्याय राहणार नाही. अशा प्रकारचे संकेत राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.